T20 World Cup 2026: आयसीसीने दिलेला प्रस्ताव बांगलादेशने धुडकावला! वाद कसा सुटणार?

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतात खेळण्यास नकार दिला आहे. तसेच या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना आयसीसी अडचणीत आली आहे. आयसीसीने बीसीबीला विचार करण्यास सांगितलं. पण त्यांनी त्यास नकार दिला आहे.

T20 World Cup 2026: आयसीसीने दिलेला प्रस्ताव बांगलादेशने धुडकावला! वाद कसा सुटणार?
आयसीसीने दिलेला प्रस्ताव बांगलादेशने धुडकावला! वाद कसा सुटणार?
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 13, 2026 | 10:33 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेची पूर्ण तयारी झाली आहे. पण भारताने आयपीएल स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमानला काढल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा जळफळाट झाला आहे. बांगलादेशने भारताची अडवणूक करण्याचं पाऊल उचललं आहे. कारण भारतात टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची तयारी झाली आहे. बांगलादेशचे सामने कुठे होणार हे देखील ठरलं आहे. त्यामुळे बांग्लादेशने हा मुद्दा पकडून भारतात खेळण्यास नकार दिला आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला हा मुद्दा मिळाल्याने ते आता चघळत आहेत. इतकंच काय तर आयसीसीचं म्हणणं देखील मानण्यास नकार दिला आहे. आयसीसीने बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला त्यांच्या मागणीवर पुनर्विचार करण्यास सांगितलं. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने हा प्रस्ताव धुडकावून लावला. बीसीबीने एका वक्तव्यात स्पष्ट केलं की आम्ही आयसीसी प्रस्ताव नाकारला आहे. तसेच दोन्ही पक्ष मिळून चर्चा करण्याचा प्रयत्न करू.

बीसीबीने सुरक्षेचं कारण पुढे करत आयसीसीकडे सामने इतरत्र घेण्याची मागणी केली आहे. बीसीबीने खेळाडू, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचं आयसीसीला सांगितलं आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आयसीसीशी चर्चा सुरु आहे. बांगलादेशी खेळाडूंना भारतात खेळणं असुरक्षित आहे. मंगळवारी आयसीसीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अध्यक्ष अमिनुल इस्लाम आणि सीईओ निजामुद्दीन चौधरी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने खेळण्यास नकार दिला तर दोनच पर्याय आयसीसीकडे शिल्लक राहतात. एक तर बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करावे लागतील. दुसरं, बांग्लादेश ऐवजी स्पर्धेत स्कॉटलँडला संधी द्यावी लागणार आहे. आता कोणता पर्याय निवडला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने माघार घेतली तर प्रश्नच उरणार नाही. पण बीसीबी हा विषय किती ताणून धरणार हा प्रश्न आहे. काही दिवस ताणून नंतर खेळण्यास तयार होतील असं क्रीडाप्रेमी म्हणत आहे. कारण इतरत्र सामन्यांचं आयोजन करणं कठीण आहे. कारण बांगलादेशसोबत इतर संघांचं वेळापत्रकही आखावं लागेल. हे काही परवडणारं नाही. त्यामुळे बांगलादेशचे सामने श्रीलंकेत आयोजित करणं कठीण दिसत आहे. आता दोनच पर्यात उरतात. एक तर बांगलादेशला भारतात खेळावं लागेल किंवा स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल.