
टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात 4 ऑक्टोबरला पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी विंडीजवर 140 धावांनी मात केली. टीम इंडियाने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयाच्या काही मिनिटांनीच बीसीसीआयने मोठी घोषणा केली. बीसीसीआय निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. टीम इंडिया या मालिकेत एकूण 5 सामने खेळणार आहे.
सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. नितीश कुमार रेड्डी याचा अपवाद वगळता निवड समितीने आशिया कप 2025 स्पर्धेतील सर्वच खेळाडूंचीच ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेसाठी निवड केली आहे. नितीश कुमार आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात नव्हता.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20I मालिकेआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा मॅचविनर आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या याला बाहेर व्हावं लागलं आहे. हार्दिकला आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यालाही दुखापतीमुळे मुकावं लागलं होतं. अंतिम सामन्याला आता आठवडा होत आलाय. तसेच टी 20I मालिकेला 29 ऑक्टोबरपासून टी 20I मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हार्दिकला झालेली दुखापत गंभीर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याच्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे. अभिषेकने नुकत्याच झालेल्या टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेत 300 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे आता अभिषेक पहिल्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कशी कामगिरी करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पहिला सामना, बुधवार, 29 ऑक्टोबर, मानुका ओव्हल
दुसरा सामना, शुक्रवार, 31 ऑक्टोबर, मेलबर्न
तिसरा सामना, रविवार, 2 नोव्हेंबर, होबार्ट
चौथा सामना, गुरुवार, 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
पाचवा सामना, शनिवार, 8 नोव्हेंबर, ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह आणि वॉशिंगटन सुंदर.