
टीम इंडियाकडून क्रिकेट खेळावं हे प्रत्येक भारतीय खेळाडूचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येक खेळाडूंचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. संघात स्थान मिळवण्यासह ते कायम ठेवणंही आताच्या घडीला आव्हानात्मक झालं आहे. भारतात इतके खेळाडू आहेत की एखाद्या सामन्यात खेळाडू अपयशी ठरला तर त्याच्या जागी दावेदार असलेले असंख्य खेळाडू आहेत. त्यामुळे संघात कायम राहण्यासाठी तुमची कामगिरी हाच मुद्दा महत्त्वाचा ठरतो. तसेच गेल्या काही वर्षात टीम इंडियाकडून अनेक युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध करत संघातील स्थान निश्चित केलंय. या खेळाडूंमुळे संघातील अनुभवी क्रिकेटपटूंना वय आणि कामगिरी या 2 मुद्द्यांमुळे संधी मिळत नाही.
या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीनंतरही निवड समितीकडून पुनरागमनाची संधी दिली जात नाही. अशात या खेळाडूंसमोर प्रतिक्षा करणं किंवा निवृत्ती घेणं याशिवाय पर्याय राहत नाही. टीम इंडियातही असे काही खेळाडू आहेत जे या वर्षभरात निवृत्त होऊ शकतात. त्यातील काही खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात.
वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने भारतासाठी 2007 साली पदार्पण केलं. तर इशांतने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा 2021 साली खेळला. इशांत तेव्हापासून कमबॅकच्या प्रतिक्षेत आहे. मात्र इशांतला आता संधी मिळेल याची चिन्हं दिसत नाहीत. इशांतने कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i क्रिकेटमध्ये अनुक्रमे 311, 115 आणि 8 विकेट्स घेतल्या आहेत.
अजिंक्य रहाणे याने भारताचं कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेतृत्व केलंय. मात्र आता रहाणेची कारकीर्द संपल्यात जमा असल्याचं चित्र आहे. रहाणे गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त कसोटीत खेळतो. मात्र तिथेही अजिंक्यला गेल्या काही वर्षांत संधी मिळालेली नाही. अजिंक्यने भारताचं 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.
उमेश यादव एक वेळ भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज होता. मात्र आता तो काय करतो? हे देखील क्रिकेट चाहत्यांना माहित नाही. उमेश देशांतर्गत क्रिकेटमध्येही विदर्भकडून मोजक्याच सामन्यांत खेळतो. त्यामुळे उमेशची लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची सोशल मीडिया पोस्ट दिसल्यास चाहत्यांनाही आश्चर्य वाटणार नाही. उमेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 288 विकेट्स घेतल्या आहेत.
मनीष पांडे एक वेळ टीम इंडियाच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक होता. मनीष आयपीएलमध्ये शतक करणारा पहिला भारतीय फलंदाजही आहे. मनीषने भारताचं 20 एकदिवसीय आणि 39 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. मात्र आता मनीषला इथून संधी मिळणं म्हणजे चमत्काराच असेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
युझवेंद्र चहल याच्यावर टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजीची मदार होती. मात्र झाला हा भूतकाळ. युझवेंद्र चहलचा गेल्या अनेक महिन्यांपासून निवड समितीकडून विचार देखील करण्यात आलेला नाही. चहलला 2023 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाहीय. त्यामुळे चहल केव्हाही निवृत्ती जाहीर करु शकतो, यात दुमत असण्याचं कारण नाही.