टीम इंडियाची घोषणा! भुवनेश्वर कुमारच्या हाती कर्णधारपदाची धुरा, कृणाल पंड्याचीही संघात एन्ट्री
Bhuvneshwar Kumar News: अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. भुवनेश्वरसोबत कृणाल पांड्या आणि नितीश राणा यांच्यासारखे भारताचे माजी खेळाडूही संघाचा भाग असतील.

भुवनेश्वर कुमार बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. २०२२ मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या भुवनेश्वर कुमारने आरसीबीसाठी आयपीएलचा हा हंगाम दमदार खेळला आहे. त्याचा भारतीय आंतरराष्ट्रीय संघात समावेश करण्यात आलेला नाही, परंतु ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान हाँगकाँगमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी त्याला हाँगकाँग सिक्सर्स संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हाँगकाँग सिक्सर्स २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
हाँगकाँगच्या मोंगकॉक येथील टिन क्वाँग रोड रिक्रिएशन ग्राऊंडवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहा-सहा खेळाडूंचे सामने असतात. प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात. ही स्पर्धा एका पूर्ण क्रिकेट सामन्याचा थरार एका वेगवान स्वरूपात सादर करते. ज्यात चौकार, नवीन फटके, खेळपट्ट्या आणि झपाट्याने बदलणारी सामन्याची समीकरणे यांचा समावेश असतो. भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
या संघात समाविष्ट असलेले सर्व खेळाडू सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. कोणीही अद्याप निवृत्त झालेले नाही. यामध्ये कृणाल पांड्या, शशांक सिंग, राहुल तेवतिया, नितीश राणा, राहुल त्रिपाठी आणि टी. नटराजन यांचा समावेश आहे. कृणालसोबतच नितीश, नटराजन आणि राहुल यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. भुवनेश्वरला आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलचा अनेक वर्षांचा अनुभव आहे.
भुवनेश्वरमध्ये नव्या चेंडूने प्रभावीपणे गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. तर कृणाल एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून संघाला अष्टपैलुत्व देतो. नितीशकडे आक्रमक फलंदाजी आणि सलामीच्या फळीत खेळण्याचा अनुभव आहे. शशांक आणि तेवतिया सामने जिंकून देण्याची आपली क्षमता दाखवतात. त्रिपाठी आक्रमकपणे खेळतो आणि नटराजन एक डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून एक अनोखा पर्याय उपलब्ध करून देतो.
टीम इंडियाने डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार पाकिस्तानविरुद्ध दोन धावांनी विजय मिळवून २०२५ हॉंगकॉंग सिक्सर्स स्पर्धेची सुरुवात केली आहे. परंतु त्यानंतरचे सामने गमावल्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले. यावेळी आव्हान अधिक कठीण असेल. पाकिस्तान २०२६ च्या स्पर्धेत गतविजेता म्हणून प्रवेश करेल. त्यांनी गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यात कुवेतला हरवून विक्रमी सहाव्यांदा हॉंगकॉंग सिक्सर्सचे विजेतेपद पटकावले होते. २०२६ च्या स्पर्धेत क्रिकेट खेळणारे आठ प्रमुख देश, तसेच चार सहयोगी सदस्य सहभागी होतील.