
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंडच्या भूमीत इतिहास घडवला आहे. शुबमनने कर्णधार म्हणून आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक द्विशतक ठोकलं आहे. शुबमनच्या कसोटी कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं द्विशतक ठरलं आहे. शुबमनने या द्विशतकी खेळीसह अंसख्य विक्रम आपल्या नावावर केले आहेत. शुबमनला या मालिकेआधी रोहित शर्मा याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर कर्णधार करण्यात आलं होतं. शुबमनने लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात शतक केलं होतं.
शुबमनने बर्मिंगहॅममधील एजबेस्टन मैदानात इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसर्या दिवशी हे द्विशतक पूर्ण केलं. शुबमनने 122 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत 200 धावा पूर्ण केल्या. शुबमनने द्विशतकासाठी 311 चेंडूचा सामना केला. शुबमनने 21 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने हे द्विशतक पूर्ण केलं.
शुबमन यासह इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत कोणत्याही आशियाई कर्णधाराला कसोटीत द्विशतक करता आलं नव्हतं. इंग्लंडमध्ये याआधी भारताकडून कर्णधार म्हणून मोहम्मद अझहरुद्दीन यांनी 179 धावा केल्या होत्या. अझहरुद्दीन यांनी 1990 साली मँचेस्टरमध्ये 179 धावा केल्या होत्या. तर आशियाई कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये सर्वाधिक 193 धावांचा विक्रम हा श्रीलंकेचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान याच्या नावावर होता. दिलशानने 2011 साली लॉर्ड्समध्ये ही कामगिरी केली होती.
कॅप्टन शुबमनचा डबल धमाका
Leading from the front 🫡
First Indian Captain to register a double-century in Test cricket in England 👏👏
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/Pm7pq7GRA9
— BCCI (@BCCI) July 3, 2025
शुबमनने या द्विशतकासह मानाच्या यादीत स्थान मिळवलं आहे. शुबमन इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. शुबमनआधी भारतासाठी दिग्गज राहुल द्रविड आणि सुनील गावसकर या दोघांनीच अशी कामगिरी केली होती.
गावसकर यांनी 1979 साली 221 धावा केल्या होत्या. त्यानंतर राहुल द्रविड याने 23 वर्षांनंतर 2002 साली ओव्हलमध्ये 217 धावांची खेळी केली. तर आता 23 वर्षांनंतर शुबमनने ही कामगिरी केली.
दरम्यान शुबमनने वैयक्तिक द्विशतकाआधी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्यासह सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. शुबमन आणि जडेजा या जोडीने सहाव्या विकेटसाठी 203 धावा जोडल्या. या जोडीने द्विशतकी भागीदारी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. आता या संधीचा इतर फलंदाज कसा आणि किती फायदा घेतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.