IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाच्या ‘या’ गोलंदाजाला पदार्पणाची संधी;कोच गंभीरची तयारी!

India Tour Of England 2025 : भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर नव्या कर्णधारासह इंग्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियासाठी टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला संधी मिळू शकते.

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाच्या या गोलंदाजाला पदार्पणाची संधी;कोच गंभीरची तयारी!
Arshdeep Singh and Harshit Rana
Image Credit source: PTI
| Updated on: May 11, 2025 | 8:16 PM

टीम इंडिया अवघ्या काही दिवसांनी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीची सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने टीम इंडिया या दौऱ्यात नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणार आहे. तसेच या दौऱ्यासाठी टीम इंडियाची 23 मे रोजी घोषणा करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशात निवड समिती या दौऱ्यासाठी भारतीय संघात टी 20I मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गोलंदाजाला संधी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

रोहित शर्मा याच्यानंतर विराट कोहली टेस्ट क्रिकेटला रामराम करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे निवड समितीकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजांसह गोलंदाजांनाही संधी मिळू शकते. अशात इंग्लंडमधील स्थिती आणि टीम इंडियाच्या गोलंदाजांची कामगिरी पाहता निवड समिती आणखी एका गोलंदाजाच्या शोधात आहे.

मोहम्मद शमी याचा फॉर्म हा चिंताजनक आहे. बुमराह ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. मोहम्मद सिराज याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध काही खास करता आलं नव्हंत. त्यामुळे निवड समिती नव्या गोलंदाजाच्या शोधात आहे. निवड समितीचा शोध अर्शदीप सिंह याच्या रुपात पूर्ण होऊ शकतो. अर्शदीपने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच अर्शदीपच्या गोलंदाजीत वैविध्य आहे. त्यामुळे अर्शदीपला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

अर्शदीपने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये 21 सामने खेळले आहेत. अर्शदीपने या 21 सामन्यांमध्ये 66 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अर्शदीपच्याच नावावर टीम इंडियासाठी टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक 99 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. त्यामुळे निवड समिती अर्शदीपबाबत काय निर्णय घेते? याकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

इंग्लंड-इंडिया टेस्ट सीरिज शेड्यूल

पहिला सामना, 20 ते 24 जून, हेडिंग्ले

दुसरा सामना, 2 ते 6 जुलै, बर्मिंगघम

तिसरा सामना, 10 ते 14 जुलै, लंडन

चौथा सामना, 23 ते 27 जुलै, मँचेस्टर

पाचवा सामना, 31 जुलै ते 4 ऑगस्ट, लंडन

टीम इंडिया इतिहास बदलणार?

दरम्यान टीम इंडियाने इंग्लंडचा इंग्लंडमध्ये 17 वर्षांपूर्वी कसोटी मालिकेत पराभव केला होता. मात्र त्यांनतर भारताला यश आलेलं नाही. त्यामुळे यंदा टीम इंडिया हा इतिहास बदलणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.