
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. 7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार असून अडीच महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. भारतीय संघ गतविजेता असून जेतेपद राखण्याचं आव्हान असणार आहे. यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेची तयारी करण्यासाठी भारताकडे एकूण 10 सामने आहेत. या सामन्यात भारताची लिटमस टेस्ट होणार आहे. टी20 वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघ घरच्या मैदानावर 10 सामने खेळेल. दोन मालिकेत प्रत्येकी 5 सामने असतील. या दोन मालिकांकडे मिनी वर्ल्डकप म्हणून पाहीलं जात आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडशी सामना करेल. भारतीय संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी20 सामने खेळेल. त्यानंतर जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल.
दुसरीकडे, भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टी20 विश्वचषकाच्या तयारीबाबत असमाधान व्यक्त केलं आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की, संघ अद्याप टी20 विश्वचषकासाठी इच्छित पातळीपर्यंत पोहोचलेला नाही.संघाकडे अजूनही चांगली तयारी करण्यासाठी बराच वेळ आहे. म्हणजेच या दहा सामन्यात भारतीय संघाला आपली क्षमता सिद्ध करून दाखवावी लागेल.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद येथे आयोजन केलं जाणार आहे. तर श्रीलंकेत कोलंबोमधील दोन आणि कँडीमधील एक स्टेडियम या विश्वचषकासाठी निवडण्यात आले आहे. ही स्पर्धा 2024 प्रमाणेच आयोजित केली जाईल. सर्व 20 संघांना प्रत्येकी पाच अशा चार गटांमध्ये विभागले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 8 फेरीत प्रवेश करतील आणि तेथून चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.