
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. निष्पाप 26 जणांच्या मृत्यूचा वचपा घेण्यासाठी भारताकडून शक्य तितके प्रयत्न सुरु आहेत. आता भारत-पाकिस्तानमध्ये शेजारी बांगलादेशने उडी घेतली आहे. बांगलादेशला असं करणं चांगलंच महागात पडू शकतं. बिघडलेल्या राजकीय संबंधांचा परिणाम क्रिकेट मालिकांवर होऊ शकतो. नियोजित वेळापत्रकानुसार, टीम इंडिया येत्या ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी 20I सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचा बांगलादेश दौरा रद्द केला जाऊ शकतो.
सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा बांगलादेश दौरा नियोजित आहे. मात्र आता याबाबत काहीही सांगणं अवघड आहे. सध्याची परिस्थिती पाहता टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाणार नाही, अशीच स्थिती आहे.
बांगलादेशच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने वादग्रस्त वक्तव्य करत भारत-बांगलादेश यांच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न केला. एएलएम फजलूर असं या बांगलादेशच्या निवृत्त अधिकाऱ्यांचं नाव आहे. या फजलूरने चीनसोबत जाण्याच्या भूमिकेसह भारतातील सात राज्य हडपण्याबाबत विधान केलं. भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशने या संधीचा फायदा घेत 7 राज्यांना (सेव्हन सिस्टर्स) आपल्यासह जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं फजलूरने म्हटलं. फजलूरच्या या विधानामुळे आता वाद पेटला आहे. ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, त्रिपुरा मणिपूर आणि मिझोराम या 7 राज्यांचा उल्लेख हा सेव्हन सिस्टर्स अर्थात सात भगिनी असा केला जातो.
भारताबाबतच्या या अशा संतापजनक विधानानंतर बीसीसीआय बांगलादेशबाबत काय कारवाई करणार? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र या अशा वक्तव्यामुळे येत्या काही दिवसात भारत बांगलादेश दौरा रद्द करु शकते. त्यामुळे बांगलादेशला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतं. अशाप्रकारे पाकिस्ताननंतर बांगलादेशची खोड मोडली जाऊ शकते.
दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कप 2025 च्या आयोजनाबाबतही संभ्रम आहे. आधीच भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध हे ताणलेले आहेत. त्यात पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांच्या भावना तीव्र आहेत. केंद्र सरकारने पाकिस्तानची कोंडी करणारे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आशिया कपच्या आयोजनाबाबत काय निर्णय होतो? याकडेही क्रिकेट वर्तुळासह साऱ्या विश्वाचं लक्ष असणार आहे.
आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेकडून केलं जात. जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर शाह यांच्या जागी पीसीबीचे सर्वेसर्वा मोहसिन नकवी यांची एसीसीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे एक पाकिस्तानी म्हणून आणि एसीसी अध्यक्ष या नात्याने नकवी आशिया कपबाबत कसा आणि काय निर्णय घेतात? याकडेही साऱ्यांची नजर असणार आहे.