
विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीने 30 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात निर्णायक खेळी करुन भारताला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. विराटने पहिल्या सामन्यात शतक केलं होतं. तर रोहितने अर्धशतक करत विराटला अप्रतिम साथ दिली होती. उभयसंघातील दुसरा सामना हा बुधवारी 3 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. दुसर्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना विराट आणि रोहितकडून पहिल्या सामन्याप्रमाणेच कामगिरी अपेक्षित आहे. मात्र ही जोडी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरणार असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय. त्यामुळे सामन्याआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे.
रोहित आणि विराट आतापर्यंत अपवाद वगळता बहुतांश वेळा दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अपयशी ठरले आहेत. विराटला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदाही 50 पेक्षा अधिक धावा करता आलेल्या नाहीत. विराटला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 वेळा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळताना 50 धावाही करता आल्या नाहीत. विराटने या 5 सामन्यांमध्ये 20 च्या सरासरीने 80 धावा केल्या आहेत. विराटने या 5 सामन्यांमध्ये अनुक्रमे 22, 0, 12, 46 नॉट आऊट, 0 अशा धावा केल्यात.
रोहितची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटपेक्षा वाईट स्थिती आहे. रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 वेळा दुसऱ्या सामन्यात खेळला आहे. रोहितने या 4 सामन्यांमध्ये 11.50 च्या सरासरीने एकूण 46 धावा केल्यात. रोहितने अनुक्रमे 9,19, 3 आणि 15 अशा धावा केल्यात. रोहितला अर्धशतकही करता आलं नाही. रोहितसारख्या दिग्गज फलंदाजाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळताना 20 पेक्षा अधिक धावा न करता येणं हे लज्जास्पद आहे.
दरम्यान विराट आणि रोहित दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या वनडे मॅचपासून सातत्याने धावा करत आहेत. या जोडीने भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयी केलं होतं. तसेच रांचीत झालेल्या सामन्यात या जोडीने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावलेली. त्यामुळे आता भारताची ही अनुभवी जोडी 3 डिसेंबरला रायपूरमध्ये ही आकडेवारी सुधारण्यासह भारताच्या सलग दुसऱ्या विजयात योगदान देतील, असा विश्वास चाहत्यांना आहे.