
भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी एकाच वेळस टी 20i त्यानंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केला. रोहित शर्मा याने भारताला त्याच्या नेतृत्वात 2024 साली टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यानंतर रोहित आणि विराट या दोघांनीही टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता काही महिन्यांआधी दोघांनी टेस्टमधून रिटायरमेंट घेतली. त्यामुळे आता दोघेही भारतासाठी फक्त वनडे फॉर्मेटमध्येच खेळताना दिसणार आहेत. या दोघांचीही कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे दोघे वनडेत फार वेळ खेळणार नाहीत, अशी चर्चा आहे.
रोहितने टी 20i नंतर भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. विराटही या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघात होता. त्यांनतर दोघेही भारतासाठी खेळलेले नाहीत. त्यानंतर आता या दोघांचं आगामी 2027 च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणं अवघड असल्याचं म्हटलं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट आणि रोहितच्या भविष्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. पीटीआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,”विराट आणि रोहित ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळणार आहेत. सध्या विराट 37 तर रोहित 38 वर्षांचा आहे. दोघेही आगामी वनडे वर्ल्ड कपपर्यंत 40 वर्षांचे होतील. त्यामुळे या मोठ्या स्पर्धेसाठी आमची योजना स्पष्ट आहे. आपण अखेरचा वर्ल्ड कप 2011 साली जिंकलोय. तसेच यंदा काही युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे.”
“रोहित आणि विराट या दोघांचं व्हाईट बॉल (वनडे आणि टी 20i) क्रिकेटमधील योगदान अनन्यसाधारण आहे. दोन्ही खेळाडूंनी खूप काही मिळवलं आहे. त्यामुळे यांच्यावर कुणीही कोणत्याही प्रकारे दबाव टाकेल, असं वाटत नाही. मात्र हे दोघे आगामी एकदिवसीय मालिकेआधी मानसिक आणि शारीरिकरित्या किती सक्षम आहेत, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे”, असंही सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान टीम इंडियाने रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर झालेल्या पहिल्याच कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर आता टीम इंडिया महिन्याभराच्या विश्रांतीनंतर आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. आशिया कप 2025 स्पर्धेचं आयोजन 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये करण्यात आलं आहे.