विराट की शुबमन? 139 डावांनंतर दोघांपैकी सरस कोण? पाहा आकडे

Virat Kohli vs Shubman Gill Comparison : शुबमन गिल याने कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेतील 2 सामन्यांमध्ये धमाकेदार कामगिरी केली. शुबमनने पहिल्या कसोटीत शतक केलं. शुबमनने दुसऱ्या सामन्यातही द्विशतक आणि शतक ठोकलं. विराट कोहली यानेही कर्णधार म्हणून नव्या प्रवासाची सुरुवात धमाकेदार अंदाजात केली होती.

विराट की शुबमन? 139 डावांनंतर दोघांपैकी सरस कोण? पाहा आकडे
Virat Kohli and Shubman Gill
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 06, 2025 | 7:18 PM

शुबमन गिल याची गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट विश्वात सातत्याने चर्चा पाहायला मिळत आहे. शुबमनला रोहित शर्मा याच्या कसोटी निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. शुबमनची इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. शुबमनने या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये बॅटिंगने चमकदार कामगिरी केली. शुबमनने यासह यशस्वीपणे पहिल्या 2 सामन्यांतच आपला ठसा उमटवला. शुबमनची तुलना कायमच भारताचा माजी फलंदाज विराट कोहली याच्यासह केली जाते. विराटनेही कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत विक्रमी धावा करुन साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानिमित्ताने विराट आणि शुबमन या दोघांपैकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 139 डावांनंतर सरस कोण? हे आकडेवारीतून जाणून घेऊयात.

विराटची आकडेवारी

विराटला ‘रनमशीन’ असं का म्हटलं जातं हे त्याची आकडेवारी पाहिल्यानंतर समजतं. विराटने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 139 डावांमध्ये 45.98 च्या सरासरीने 5 हजार 610 धावा केल्या होत्या. विराटने या दरम्यान 17 शतकं झळकावली होती.

शुबमन गिल

शुबमन गिल याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 139 डावांमध्ये 5 हजार 831 धावा केल्या. शुबमन गिल याने 47.02 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत.  शुबमनने या दरम्यान 17 शतकं ठोकली. त्यामुळे आकडेवारीवरुन शुबमन 139 आंतरराष्ट्रीय डावांनंतर विराटपेक्षा सरस आहे, हे सिद्ध होतं. शुबमनची सरासरी आणि धावा 139 डावांनंतर विराटच्या तुलनेत जास्त आहे. तर दोघे शतकाबाबत बरोबरीत आहेत.

विराटने क्रिकेट कारकीर्दीत अनेक चढ-उतार पाहिले.  तसेच विराटने फलंदाज म्हणूनही क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला. विराट भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारही ठरला. विराटने टेस्ट, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये उल्लेखीनय कामगिरी केली आणि अनेक विक्रम रचले. तर अनेक वेळा खोऱ्याने धावा करणाऱ्या विराटला धावांसाठी संघर्षही करावा लागला. मात्र विराटने भारताला असंख्य सामन्यात एकहाती विजय मिळवून दिला. विराटनेच आक्रमक बॅटिंग आणि फिटनेसचा ट्रेंड सेट केला. तर दुसऱ्या बाजूला शुबमनची युवा आणि संयमी अशी ओळख आहे. शुबमनमध्ये विराटचा क्रिकेटमधील वारसा यशस्वीरित्या पुढे नेण्याची क्षमता आहे.

शुबमन गिलची इंग्लंड विरुद्धच्या 2 सामन्यांमधील कामगिरी

दरम्यान शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील 2 सामन्यांमधील 4 डावांत 146.25 च्या सरासरीने 585 धावा केल्या आहेत. शुबमनने या दरम्यान 1 द्विशतक आणि 2 शतकं झळकावली आहेत. त्यामुळे शुबमनकडे या मालिकेत सहज 1 हजार धावा करण्याची संधी आहे.