
टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरूद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अडीच दिवसातच हा सामना जिंकला आहे. भारताने विंडीजवर 140 धावा आणि डावाने हा विजय साकारला आहे. भारताने विंडीजच्या 162 च्या प्रत्युत्तरात पहिला डाव हा 448 धावांवर घोषित केला. त्यानंतर टीम इंडियाने विंडीजला दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी 286 धावांची आघाडी मोडण्याआधीच गुंडाळलं. भारताने विंडीजला 146 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने एकतर्फी आघाडी घेतली.
टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी ड्रेसिंग रुममध्येच पहिला डाव 5 बाद 448 धावांवर घोषित केला. त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या विंडीजला भारतीय गोलंदाजांसमोर धड 2 सत्रही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी विंडीजचं 45 ओव्हरमध्ये 146 रन्सवर पॅकअप केलं. टीम इंडियासाठी मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या चौघांनी विंडीजला ऑलआऊट केलं. रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कुलदीप यादव याने दोघांना आऊट केलं. तर वॉशिंग्टन सुंदर याने 1 विकेट मिळवली.
विंडीजसाठी दोन्ही डावात एकालाही अर्धशतक करता आलं नाही. विंडीजसाठी दुसर्या डावात एलिक अथानाजे याने सर्वाधिक 38 धावा केल्या. जस्टीन ग्रीव्स याने 25 रन्स केल्या. जेडन सील्स याने 22 धावांचं योगदान दिलं. तर इतर 5 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
त्याआधी टॉस जिंकून बॅटिंग घेणाऱ्या पाहुण्या विंडीजला भारताने पहिल्या डावात 162 रन्सवर ऑलआऊट केलं. सिराजने सर्वाधिक 4 तर बुमराहने 3 विकेट्स मिळवल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. त्यानंतर टीम इंडियासाठी तिघांनी शतक झळकावलं.
केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने शतकं झळकावली. केएलचं कसोटी कारकीर्दीतील 11 वं तर मायदेशातील दुसरं शतक ठरलं. ध्रुवचं पहिलंवहिलं शतक ठरलं. तर जडेजाचं उपकर्णधार म्हणून पहिलं तर कसोटीतील सहावं शतक ठरलं. तसेच कर्णधार शुबमनने अर्धशतकी खेळी केली. भारताने अशाप्रकारे 448 धावांचा डोंगर उभा केला.
दरम्यान भारतीय कसोटी संघाचा शुबमनच्या नेतृत्वातील विंडीज विरुद्ध मायदेशातील पहिला आणि एकूण तिसरा विजय ठरला. शुबमनने रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीपासून नेतृत्वाची धुरा हाती घेतली. शुबमनने कर्णधार म्हणून इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. त्यानंतर आता विंडीला पराभवाची धुळ चारली आहे. आता उभयसंघातील दुसरा आणि अंतिम सामना हा 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. भारताला हा सामना जिंकून विंडीजला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. तर विंडीजसमोर अंतिम सामना जिंकून मालिका बरोबरीत राखण्याचं आव्हान असणार आहे.