Jasprit Bumrah : भारताच्या गोलंदाजीचा कणा मोडला, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, कुणाला संधी?
Jasprit Bumrah Icc Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेनंतर आता टीम इंडियामागेही दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.

क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही आठवड्यांपासून ज्याची भीती होती, तेच घडलं आहे. भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज ‘यॉर्कर किंग’ अशी बिरुदावली मिरवणारा जसप्रीत बुमराह आयसीसी चॅम्पिन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. बुमराह स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच बुमराहच्या जागी कुणाला संधी देण्यात आली आहे? याबाबतही बीसीसीआयने सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत
टीम इंडिया काही महिन्यांपूर्वी बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. बुमराहला या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पाठीला दुखापत झाली. बुमराहला या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर बुमराहवर आवश्यक ते उपचार करण्यात आले. तसेच चाचणीही करण्यात आली. बुमराह त्यानंतर परतला. मात्र त्याला दुखापतीमुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नव्हती.
टीम इंडिया मायदेशात परतल्यानंतर बुमराहच्या दुखापतीची अपडेट घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी बुमराहचे रिपोर्ट काढण्यात आले. त्यानुसार मंगळवारी 11 फेब्रुवारीला बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार की नाही? हे निश्चित होणार होतं. बुमराह फिट झालेला असावा, तो चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळावा, अशी अनेक क्रिकेट चाहते प्रार्थना करत होते. मात्र शेवटी बुमराहला दुखापतीमुळे खेळता येणार नाही, असं बीसीसीआयने 11 फेब्रुवारीला रात्री 11 वाजून 27 मिनिटांनी जाहीर केलं.
हर्षित राणाचा समावेश
दरम्यान जसप्रीत बुमराह याच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात हर्षित राणा या युवा गोलंदाजाचा समावेश करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. हर्षित राणा याची इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बुमराहचा बॅकअप म्हणूनही समावेश करण्यात आलाय. बुमराह इंग्लंडविरुद्ध पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांत खेळू शकणार नाही, असं निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर बुमराह संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला. त्यामुळे हर्षितला पदार्पणाची संधी मिळाली.
बुमराह बाहेर झाल्याने त्याच्या जागी शार्दूल ठाकुर किंवा मोहम्मद सिराज या दोघांपैकी एकाला संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या जवळचा असल्याने हर्षितला संधी मिळाली, असंही नेटकरी सोशल मीडियावर म्हणत आहेत.
भारतीय संघाचं चॅम्पियन्स ट्रॉफीतील वेळापत्रक
इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 23 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 2 मार्च, दुबई
सेमी फायनल-1, 4 मार्च, दुबई
सेमी फायनल-2, 5 मार्च, लाहोर
फायनल, 9 मार्च, लाहोर, टीम इंडिया पोहचल्यास दुबई
10 मार्च, (अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस)
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर
🚨 NEWS 🚨
Fast bowler Jasprit Bumrah has been ruled out of the 2025 ICC Champions Trophy due to a lower back injury. Harshit Rana named replacement.
Other squad updates 🔽 #TeamIndia | #ChampionsTrophy https://t.co/RML5I79gKL
— BCCI (@BCCI) February 11, 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.