IPL 2026 लिलावातून या तीन स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता, कारण की…

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी समोर आली आहे. आता मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी अबूधाबीत पार पडणार आहेत. या लिलावात 77 खेळाडू रिंगणात असतील. आंद्रे रसेल आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावरही बोली लागेल.

IPL 2026 लिलावातून या तीन स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता, कारण की...
IPL 2026 लिलावातून या तीन स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता, कारण की...
Image Credit source: (BCCI Photo)
Updated on: Nov 18, 2025 | 9:32 PM

आयपीएल 2026 स्पर्धा मार्चपासून सुरु होणार आहे. पण त्यासाठी संघाची बांधणी आतापासून सुरू झाली आहे. ट्रेड विंडोच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या खेळाडूंची ट्रेड सुरु आहे. त्यात संघात ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावंही जाहीर केली आहेत. आंद्रे रसेल, ग्लेन मॅक्सवेल, वेंकटेश अय्यर यासारखे दिग्गज खेळाडू लिलावाचा असतील. या खेळाडूंवर बोली लागणार आहे. जास्तीत जास्त 77 खेळाडूंवर बोली लावू शकणार आहेत. पण बीसीसीआयने नियम अधिक कठोर केल्याने तीन स्टार खेळाडूंना लिलावात भाग घेता येणार नाही. यात इंग्लंडच्या कर्णधाराचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएल 2025 स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे या खेळाडूंवर कठोर नियम लादले गेले आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने दोन महत्त्वाचे नवीन नियम लागू केले आहेत. लिलावाबाबतचे नियम प्रामुख्याने विदेशी खेळाडूंसाठी आहेत.

दोन नियम

  • कोणत्याही परदेशी खेळाडूने मेगा लिलावासाठी आगाऊ नोंदणी केली नाही, तर तो पुढील हंगामात होणाऱ्या मिनी लिलावात सहभागी होण्यास अपात्र ठरेल.
  • एखाद्या खेळाडूला लिलावाद्वारे खरेदी केलं असेल आणि काही कारणांमुळे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याचे नाव मागे घेतले तर त्याला लिलाव स्पर्धेत भाग घेता येणार नाही. त्याच्यावर 2 वर्षांसाठी बंदी घातली जाईल.

वरील दोन नियमामुळे तीन दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता

  1. बेन स्टोक्स: इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने गेल्या वर्षीच्या मेगा लिलावासाठी नोंदणी केली नव्हती. त्याने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्याचं कारण सांगितलं होतं. तसेच इंग्लंडसाठी जास्त काळ खेळण्याची इच्छा व्यक्त करत नोंदणी केली नाही. त्यामुळे आगामी मिनी लिलावात सहभागी होऊ शकणार नाही.
  2. हॅरी ब्रूक: इंग्लंडचा वनडे आणि टी20 संघाचा कर्णधार हॅरी ब्रूक यालाही फटका बसला आहे. 2024 मध्ये, आजीच्या निधनामुळे आयपीएलमधून माघार घेतली. 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले. पण ब्रूकने पुन्हा स्पर्धेतून माघार घेतली. यामुळे, त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
  3. जेसन रॉय: इंग्लंडचा आक्रमक सलामीवीर जेसन रॉय देखील या यादीत आहे. त्याने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2024 मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 2025 च्या मेगा लिलावातही नोंदणी केली नाही. नोंदणी न केल्यामुळे जेसन रॉय आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात भाग घेण्यास पात्र नाही.