
आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजण्याआधीच संघाची बांधणी सुरु आहे. रिटेन केलेल्या खेळाडूंनंतर आता आवश्यक खेळाडूंसाठी बोली लावण्याची वेळ आली आहे. 16 डिसेंबर रोजी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. फ्रेंचायझी आपल्या संघाच्या गरजेनुसार खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आतापर्यंत मिनी लिलावासाठी 1355 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी आता फक्त 350 खेळाडूंवर बोली लागणार असून 1005 खेळाडूंना मिनी लिलावातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बाहेर केलेल्या खेळाडूंमध्ये तीन दिग्गज खेळाडूंचं नावही आहे. खरं त्यांना घेण्यासाठी कोणत्याही फ्रेंचायझीने पायघड्या टाकल्या असत्या. पण बीसीसीआयच्या कठोर नियमाचा त्यांना फटका बसला आहे. हे तिन्ही खेळाडू इंग्लंडचे असून त्यांच्यात सामना पालटण्याची ताकद आहे. पण आता त्यांना या स्पर्धेत खेळता येणार नाही.
आयपीएल 2026 मिनी लिलावात बंदी घातलेल्या खेळाडूंमध्ये बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक आणि जेसन रॉय यांची नावे आहेत. हॅरी ब्रूक आणि जेसन रॉय यांना मेगा लिलाव 2025 मध्ये भाव मिळाला होता. पण त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे फ्रेंचायझींचं गणित ऐनवेळी बिघडलं होतं. या खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी घेतलं होतं. पण त्याने इंग्लंडच्या स्थानिक हंगामात खेळण्यासाठी लीग सोडली. त्याच्यावर 2026 आणि 2027 मध्ये खेळण्यास बंदी आहे. जेसन रॉय याने 2024 मध्ये वैयक्तिक कारणासाठी आयपीएल सोडले होते. त्याने 2025 च्या आयपीएलमध्ये भाग घेतला नाही. बेन स्टोक्सनेही असंच केलं होतं. त्यामुळे त्याच्यावर बंदी घातली आहे.