11 चौकार-3 षटकार, पदार्पणात कडक शतक, भारतीय फलंदाजाचा इंग्लंडमध्ये कारनामा

Cricket : इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीत लीड्समध्ये टीम इंडियाच्या 4 फलंदाजांनी 5 शतकं झळकावली. त्यानंतर भारताच्या आणखी एका खेळाडूने इंग्लंडमध्ये शतक केलंय. कोण आहे तो?

11 चौकार-3 षटकार, पदार्पणात कडक शतक, भारतीय फलंदाजाचा इंग्लंडमध्ये कारनामा
Tilak Varma Century
| Updated on: Jun 24, 2025 | 5:08 PM

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा हेडिंग्ले लीड्समध्ये खेळवण्यात येत आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी दोन्ही डावात शानदार कामगिरी केली. ओपनर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल या तिघांनी शतक केलं. तर ऋषभ पंत याने दोन्ही डावात शतक करुन इतिहास घडवला. टीम इंडियाच्या फलंदाजांनी यासह एका कसोटी सामन्यात 5 शतकं केली. टीम इंडियाची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एका डावात 5 शतकं करण्याची पहिलीच ठरली.

तिलककडून काउंटी चॅम्पियनशीपमध्ये कडक सुरुवात

त्यानंतर आता आणखी एका भारतीय फलंदाजांने इंग्लंडमध्ये शतक केलंय. मात्र हा खेळाडू कसोटी मालिकेचा भाग नाही. भारताच्या या खेळाडूने इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत शतक झळकावलं आहे. विशेष म्हणजे या भारतीय खेळाडूने काउंटी चॅम्पियनशीप डेब्यूत शतक करण्याची कामगिरी केली आहे.

भारताचा युवा आणि टी 20I स्पेशालिस्ट फलंदाज तिलक वर्मा याने काउंटी चॅम्पियनशीपमध्ये शतक झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिलकने या स्पर्धेत हॅम्पशायरकडून खेळताना एसेक्स विरुद्ध पदार्पणात ही कामगिरी केली आहे. प्रत्येक खेळाडूची पदार्पणातील सामन्यात अविस्मरणीय खेळी करण्याचा प्रयत्न असतो. भारताचा हा 22 वर्षीय फलंदाज तसं करण्यात यशस्वी ठरला आहे.

तिलकचं निर्णायक क्षणी शतक

तिलकने निर्णायक क्षणी ही खेळी केली. टीमने 34 धावांवर 2 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर तिलक मैदानात आला. तिलकने या दरम्यान काही मोठे फटके मारले. तिलकने 239 चेंडूमध्ये शतक पूर्ण केलं. तिलकने या दरम्यान 11 चौकार आणि 3 षटकार लगावले.

तिलक वर्मा याला होणार असा फायदा

तिलकचं काउंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळणं टीम इंडियासाठी सकारात्मक बाब आहे. काउंटी क्रिकेटमध्ये खेळणं प्रत्येक फलंदाज आणि गोलंदाजासाठी आव्हानात्मक समजलं जातं. या काउंटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना स्विंग आणि सीमचा सामना करावा लागतो. त्यामुळे फलंदाजांच्या तंत्रात सुधार होतो. तिलकसाठी हा अनुभव भविष्यात फायदेशीर ठरु शकतो. तसेच तिलकला काउंटी क्रिकेटच्या माध्यमातून बॅटिंगमध्ये सुधारणा करण्याचीही संधी मिळेल.