टिम डेविडने मैदानातच काढले कपडे आणि लुटला पावसाचा आनंद, चिन्नास्वामी स्टेडियम झालं स्विमिंग पूल Video

आयपीएल 2025 स्पर्धेचा उत्तरार्ध 17 मे पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. पण या सामन्यापूर्वी आरसीबीकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टिम डेविडचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

टिम डेविडने मैदानातच काढले कपडे आणि लुटला पावसाचा आनंद, चिन्नास्वामी स्टेडियम झालं स्विमिंग पूल Video
टिम डेविड
Image Credit source: video grab
| Updated on: May 16, 2025 | 6:29 PM

पहिला पाऊस आणि मातीचा सुगंध कोणालाही आकर्षित करतं. मग तो सेलिब्रेटी असो, खेळाडू असो की सामान्य व्यक्ती.. प्रत्येकाला पहिल्या पावसाची भूरळ पडते. खरं तर भारतात पावसाला सुरुवात झाली नाही. पण अवकाळी पाऊस काही ठिकाणी बसरत आहे. चिन्नास्वामी मैदानात पावसाने हजेरी लावली. सध्या आयपीएल स्पर्धा स्थगित असल्याने खेळाडू सराव करत आहे. आयपीएल स्पर्धा 17 मे पासून सुरु होणार आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिला सामना होणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावली. मैदानात सराव करत असलेल्या आरसीबीच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये धाव घेतली. पण ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू टिम डेविड याने पळ काढण्याऐवजी पावसाचा मनमुराद आनंद लुटला. कपडे काढले आणि मैदानातच पावसात चिंब भिजू लागला. मैदान ओलं होऊ नये यासाठी त्यावर कव्हर केलं होतं. पण त्या कव्हरवर साठलेल्या पाण्यात टिम डेविडने उड्या मारल्या. आरसीबीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच व्हिडीओला ‘स्विम डेविड’ अशी कॅप्शन दिली आहे.

टिम डेविडचा अंदाज पाहून इतर खेळाडूही आनंदीत झाले. त्याला अशा पद्धतीने पावसाचा आनंद लुटताना पाहून हसत होते. काही खेळाडूंनी तर त्याला उड्या मारताना पाहून टाळ्या वाजवल्या. टिम डेविडसह फिल साल्ट, लुंगी एनगिडी भारतात परतले आहेत. इतकंच काय तर विराट कोहली, रजत पाटिदार हे देखील सराव शिबिरात सहभागी झाले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टिम डेविडला 3 कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतलं आहे. आरसीबीसाठी या पर्वात फिनिशरची भूमिका बजावत आहे. आतापर्यंत त्याने ही भूमिका चोखपणे बजावली आहे. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजांना फोडून काढत आहे. आयपीएलच्या 11 सामन्यात त्याने 93 च्या सरासरीने आणि 193.75 च्या स्ट्राईक रेटने 186 धावा केल्या आहेत.

दरम्यान, 17 मे रोजी आरसीबी आणि केकेआर सामन्यात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार 65 टक्के पावसाचा अंदाज आहे. जर पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर केकेआरचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. तर आरसीबीला एक गुण मिळाल्याने प्लेऑपच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडेल.