
वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळणारी सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाचे दोन खेळाडूंना बंदुकधारी चोरट्यांनी लुटलं. बंदुकीचा धाक दाखवून किमती ऐवज लुटला. यामुळे स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंच्या मनात भीतीचं सावट आहे. ही घटना 8 आणि 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. दोन खेळाडू आणि कॅरेबियन प्रीमियर लीगचा एक अधिकारी कार्यक्रमातून परतत असताना हा प्रकार घडला. यावेळी चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवला आणि किमती ऐवज लुटून नेला. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, ही घटना 9 सप्टेंबरच्या रात्री 3 वाजण्याच्या आसपास घडली.
माहितीनुसार, दोन खेळाडू आणि अधिकारी एका खासगी कार्यक्रमातून परतत होते. यावेळी रुमवर जाण्यापूर्वी काही खाण्यासाठी थांबले. तेव्हा काही चोरट्यांनी त्यांना घेरलं आणि बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या धाकाच्या जोरावर त्यांनी त्यांच्याकडून दागिने, फोनसहीत महागडं सामान लुटलं. सर्व मुद्देमाल घेतल्यानंतर त्यांना आहे तसंच सोडून पोबारा केला. या दरम्यान, पळून जातात एका चोरट्याची बंदूक पडली. ही बंदुक पोलिसांनी जप्त केली असून घटनेचा तपास केला जात आहे.
कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील फ्रेंचायझी सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्सने या धक्कादायक घटनेची पुष्टी केली आहे. तसेच दोन्ही खेळाडू आणि अधिकारी सुखरूप असल्याचं देखील सांगितलं आहे. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पण कोणत्या खेळाडूंना लुटलं याबाबत कोणतीही माहिती फ्रेंचायझीने उघड केली नाही. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच चोरट्यांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील असं देखील सांगितलं आहे. बारबाडोस पोलिसांनी सांगितलं की, जप्त केलेल्या बंदुकीचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सुरक्षेची हमी देखील दिली आहे.
या घटनेनंतर खेळाडूंमध्ये दहशतीचं वातावरण आहे. पण आता ते स्थिरस्थावर असल्याचं कळत आहे. सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्सने आता पुढच्या सामन्याची तयारी सुरु केली आहे. या संघाचा पुढचा सामना 11 सप्टेंबरला होणार आहे. पण त्या दोन खेळाडूंना संघात स्थान मिळेल की नाही हे अस्पष्ट आहे.