U19 WC: वैभव सूर्यवंशीची दांडी गूल! विराट कोहलीच्या फॅनने दिला पहिल्याच सामन्यात दणका Video

ICC Under 19 World Cup 2026: अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारत आणि अमेरिका हे संघ आमनेसामने आले आहेत. पण पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आला. असं असताना विजयी धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला.

U19 WC: वैभव सूर्यवंशीची दांडी गूल! विराट कोहलीच्या फॅनने दिला पहिल्याच सामन्यात दणका Video
वैभव सूर्यवंशीची दांडी गूल! विराट कोहलीच्या फॅनने दिला पहिल्याच सामन्यात दणका Video
Image Credit source: स्टार स्पोर्ट्स स्क्रीनशॉट
| Updated on: Jan 15, 2026 | 5:54 PM

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारत आणि अमेरिका सामना होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेनिल पटेलच्या भेदक गोलंदाजीमुळे अमेरिकेचा डाव 107 धावांवर आटोपला. अमेरिका फक्त 35.2 षटकात गारद झाली. या धावांचा पाठलाग करताना भारताने 4 षटकात 1 गडी गमवून 21 धावा केल्या. पण पावसाच्या व्यतयामुळे सामना थांबवला गेला. असं असताना वैभव सूर्यवंशी अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात 4 चेंडूत फक्त 2 धावा करून बाद झाला. वैभव सूर्यवंशी आक्रमक खेळ करण्यासाठी ओळखला जातो. त्याने रित्विक अपीडीच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अंदाज हुकला आणि थेट स्टम्प घेऊन गेला. षटकाराऐवजी विकेट देऊन तंबूत परतला. 17 वर्षीय रित्विक अपीडीने त्याला बाद केलं. खरं तर बुलावायोच्या क्वींस स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती. त्याचा प्रत्यय वैभव सूर्यवंशीला आला.

वैभव सूर्यवंशीची विकेट काढल्यानंतर रित्विक अपीडीने जोरदार सेलीब्रेशन केलं. खरं तर पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्यात पूर्णपणे अपयशी ठरला. रित्विक अपीडीने संघाचं पहिलं षटक टाकलं. कर्णधार आयुष म्हात्रे स्ट्राईकला होता. त्याने पहिले तीन चेंडू निर्धाव घालवले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर 1 धावा काढली. पाचव्या चेंडूवर वैभव सूर्यवंशी समोर आला. त्याचा सामना करताना धाव काही काढली नाही. सहाव्या चेंडूवर वैभव सूर्यवंशीने दोन धावा काढल्या. संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा रित्विक अपीडी आला. त्याचा पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर पुढे येऊन षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण बॅटचा आतला भाग लागला आणि चेंडू स्टंपवर आदळला.

रित्विक विराट कोहलीचा फॅन

रित्विक अपीडी हा भारतीय वंशाचा असून त्याचे नातेवाईक तेलंगणात राहतात. त्याने वयाच्या दहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. तसेच अंडर 19 नॅशनल्समध्ये टॉप 10 रॅकिंग मिळवली. रित्विकने अंडर 19 संघासाठी अर्जेंटीना विरुद्ध डेब्यू केलं होतं. अमेरिकेचा अष्टपैलू खेळाडू असून फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण त्याने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. रित्विक विराट कोहलीचा मोठा फॅन आहे. सामना सुरू होण्याआधीच त्याने ही बाब अधोरेखित केली.