Vaibhav Suryavanshi: भाऊ ऐकतच नाय! वैभव सूर्यवंशीचा U19 वर्ल्ड कपआधी धूमधडाका, 9 चौकार-7 षटकारांसह 96 धावांची खेळी

India vs Scotland U19 : वैभव सूर्यवंशी याने अंडर 19 वर्ल्ड कपआधी चाबूक खेळी केली आहे. वैभवने स्कॉटलंड विरुद्ध 96 धावा फटकावल्या आहेत. वैभवने या खेळीत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.

Vaibhav Suryavanshi: भाऊ ऐकतच नाय! वैभव सूर्यवंशीचा U19 वर्ल्ड कपआधी धूमधडाका, 9 चौकार-7 षटकारांसह 96 धावांची खेळी
Vaibhav Suryavanshi U19 Team India
Image Credit source: TV9 Bharatvarsh
| Updated on: Jan 10, 2026 | 5:33 PM

अंडर 19 टीम इंडियाने वैभव सूर्यवंशी याच्या नेतृत्वात 2026 वर्षाची तडाख्यात सुरुवात केली. भारताने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच घरात क्लिन स्वीप केलं. भारताने दक्षिण आफ्रिकेचा यूथ वनडे सीरिजमध्ये 3-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. वैभवने या मालिकेत बॅटिंगसह कर्णधार म्हणूनही छाप सोडली. आता टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेला 15 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्या स्पर्धेआधी वैभवने ट्रेलर दाखवला आहे. वैभवने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात वादळी खेळी केली.

वैभवने या सराव सामन्यात चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांची धुलाई केली. वैभवने मर्जीनुसार बॅटिंग केली. मात्र वैभव शतक करण्यात अपयशी ठरला. मात्र वैभवने या खेळीसह वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य सामन्यांसाठी सज्ज असल्याचं या खेळीतून जाहीर केलं आहे. झिंबाब्वे आणि नामिबियात 15 जानेवारीपासून अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

वैभव सूर्यवंशीकडून स्कॉटलंडची धुलाई

वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यांना शनिवार 10 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. वैभवने स्कॉटलंड विरूद्धच्या या पहिल्या सराव सामन्यात धमाका केला. वैभवने आतापर्यंत इतर संघांच्या गोलंदाजांची जी स्थिती केली तशीच वागणूक त्याने स्कॉटलंडच्या गोलंदाजांनाही दिली. वैभवने स्कॉटलंडचा बॅटिंगने चांगलाच समाचार घेतला. मात्र वैभवचं शतक अवघ्या काही धावांनी हुकलं. वैभवच्या खेळीचा शेवट 96 धावांवर झाला.

वैभवची चाबूक खेळी

वैभवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या यूथ वनडे सीरिजमधील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये तडाखेदार खेळी केली होती. वैभवने तोच तडाखा स्कॉटलंड विरुद्ध कायम ठेवला. वैभवने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने अर्धशतकानंतरही हाच वेग कायम ठेवत बॅटिंग केली. मात्र वैभव शतकापासून 4 धावांनी दूर असताना बाद झाला.

वैभवने 50 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 96 धावा केल्या. वैभवची ही 50 पेक्षा अधिक धावा करण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली. वैभवने त्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या 2 सामन्यांमध्ये अनुक्रमे 68 आणि 127 धावा केल्या होत्या.

वैभवच्या खेळीची अमेरिकेला धडकी!

दरम्यान वैभव सूर्यवंशी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने जसं खेळतोय ते पाहता अमेरिका क्रिकेट संघाला धडकी भरली नसेल तरच नवल. टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 15 जानेवारीला अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. वैभव त्या सामन्यात किती धावा करतो याची प्रतिक्षा चाहत्यांना असणार आहे.