
India vs Pakistan ICC U19 World Cup 2026: आयसीसी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस वाढली आहे. त्यामुळे कोणते चार संघ उपांत्य फेरी गाठतात याची उत्सुकता आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्याची रंगत वाढली आहे. अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 1 फेब्रुवारी 2026 रोजी भारत पाकिस्तान सामना होत आहे. हा सामना भारतापेक्षा पाकिस्तानसाठी खूपच महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला दोन गुण आणि नेट रनरेटचं गणित देखील सोडवायचं आहे. त्या तुलनेत भारताचं गणित सोपं आहे. भारताने हा सामना जिंकला काय आणि हरला काय? तरी फरक पडणार नाही, असं चित्र आहे. हा सामना झिम्बाब्वेच्या बुलावायोच्या क्वींस स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाणार आहे.
भारत पाकिस्तान देशात आणि संघात विस्तवही जात नाही. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याने भारताने बोलणं सोडा, हँडशेकही करणंही टाळलं आहे. त्यामुळे या सामन्यातही असंच चित्र असेल यात काही शंका नाही. पण या सामन्यापूर्वी चित्र काही वेगळं आहे. स्पर्धेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे क्वींस स्पोर्ट्स क्लबमध्ये सरावासाठी स्लॉट उपलब्ध नाही. त्यामुळे दोन्ही संघांना बुलावायोच्या एथलेटिक क्लबमध्ये एकत्र सराव करावा लागत आहे. सराव मैदानच नाही तर एकाच हॉटेलमध्ये थांबवण्याची वेळ आली आहे.
स्पर्धेत अनेक सामने एकाच वेळी होत आहेत. त्यामुळे सुविधांचा अभाव दिसून येत आहे. इच्छा नसताना दोन्ही संघांना एकत्र वेळ घालावावा लागत आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये दोन्ही संघ वेगवेगळा सराव करतात. पण यावेळी सराव शिबिरात दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात एकत्र दिसले. असं असलं तरी दोन्ही संघांनी एकाच मैदानात वेगवेगळा सराव केला.
भारताने आतापर्यंत स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील तिन्ही सामन्यात विजय मिळवला होता. तर सुपर 6 फेरीत झिम्बाव्बेचा 204 धावांनी धुव्वा उडवून नेट रनरेट जबरदस्त केला आहे. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरी खेळण्याचं गणित सोपं झालं आहे.