SA vs AUS Semi Final : दक्षिण आफ्रिकेची वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत सलग दुसऱ्यांदा पराभव

South Africa Women U19 vs Australia Women U19 Semi Final 1 Match Result : दक्षिण आफ्रिकेने अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला.

SA vs AUS Semi Final : दक्षिण आफ्रिकेची वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत सलग दुसऱ्यांदा पराभव
under 19 women south africa qualify for t20i world cup final
| Updated on: Jan 31, 2025 | 11:31 AM

दक्षिण आफ्रिका टीमने अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड 2025 स्पर्धतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिका आता आंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील विजयी संघाविरुद्ध वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भिडणार आहे. अंतिम सामना हा रविवारी 2 फेब्रुवारीला होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून ओपनर जेम्मा बोथा हीने सर्वाधिक 37 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन कायला रेनेके हीने 26 धावा जोडल्या. तर कराबो मेसो हीने 19 रन्स केल्या. तसेच इतरांनीही छोटी खेळी करुन दक्षिण आफ्रिकेच्या विजयात योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाकडून लुसी हॅमिल्टन आणि हसरत गिल या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर क्लो एन्सवर्थ हीने एक विकेट मिळवली.

दक्षिण आफ्रिकेची फायनलची हॅटट्रिक

दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या मेन्स आणि वूमन्स या दोन्ही सिनिअर टीमनंतर आता अंडर 19 वूमन्स टीमनेही टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक दिली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सिनिअर मेन्स आणि वूमन्स टीमला अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागल्याने वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंग झालं होतं. मात्र आता अंडर 19 टीमने दक्षिण आफ्रिकेसाठी वर्ल्ड कप जिंकावा, अशी आशा त्यांच्या क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.

सिनिअर टीमचा अंतिम फेरीत पराभव

दक्षिण आफ्रिका वूमन्स टीमला 20 ऑक्टोबर 2024ला वूमन्स टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने 32 धावांनी पराभूत केलं होतं. तर त्याआधी मेन्स टीम इंडियाने 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेवर फायनलमध्ये 7 धावांनी पराभव करत वर्ल्ड कप उंचावला होता.

ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत सलग दुसऱ्यांदा पराभव

दरम्यान ऑस्ट्रेलियाची अंडर 19 वूमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभूत होण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी 27 जानेवारी 2023 रोजी इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर सेमी फायनलमध्ये 3 धावांनी सनसनाटी विजय मिळवला होता.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: कायला रेनेके (कर्णधार), जेम्मा बोथा, सिमोन लॉरेन्स, फे काउलिंग, कराबो मेसो (विकेटकीपर), मिके व्हॅन वुर्स्ट, सेशनी नायडू, लुयांडा न्झुझा, अ‍ॅशले व्हॅन विक, मोनालिसा लेगोडी आणि न्थाबिसेंग निनी

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: लुसी हॅमिल्टन (कर्णधार), ग्रेस लायन्स (विकेटकीपर), इनेस मॅककॉन, काओइमहे ब्रे, एलेनोर लारोसा, हसरत गिल, एला ब्रिस्को, क्लो एन्सवर्थ, लिली बॅसिंगथवेट, टेगन विल्यमसन आणि ज्युलिएट मॉर्टन.