
बीसीसीआय निवड समितीने शनिवारी 4 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने यासह एकदिवसीय संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणाही केली. बीसीसीआयने रोहित शर्मा याच्या जागी युवा शुबमन गिल याला एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. तसेच रोहितची कॅप्टन्सी जाताच त्याच्या खास भिडूचा वनडे टीममधून पत्ता कट करण्यात आला. रोहितच्या या विश्वासू खेळाडूने भारताला काही महिन्यांपूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
निवड समितीने मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीममधून वगळलं. वरुणने भारताला 12 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी करण्यासाठी योगदान दिलं होतं. वरुण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील एकूण दुसरा आणि भारताचा पहिला यशस्वी गोलंदाज ठरला होता.
वरुणला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकूण 3 सामने खेळण्याची संधी मिळाली. वरुणने या 3 मॅचमध्ये 15.11 अशा बॉलिंग एव्हरेजने 9 विकेट्स मिळवल्या होत्या. विशेष म्हणजे वरुणने या 9 पैकी 5 विकेट्स एकाच सामन्यात घेतल्या होत्या.
मुंबईत मंगळवारी 7 ऑक्टोबरला सीएट अवॉर्ड शो पार पडला. वरुणचा या कार्यक्रमात ‘इंटरनॅशनल बॉलर ऑफ द इअर’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. वरुणने या कार्यक्रमात रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचं श्रेय दिलं. “माझी या स्पर्धेसाठी निवड होईल याची मला आशा नव्हती. मात्र मी रोहित शर्मा याचा आभारी आहे. रोहितने माझ्यावर विश्वास दाखवला आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दिली”, असं वरुणने म्हटलं आणि रोहितचे जाहीर आभार मानले.
वरुणने त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा सामना हा 9 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. भारताने 9 रोजी न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. वरुणने एकदिवसीय कारकीर्दीतील एकूण 4 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान वरुणची ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेनंतर टी 20i सीरिज खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने होणार आहेत.