VHT 2025-26: क्वार्टर फायनलसाठी 8 संघ फिक्स, मुंबईसमोर कुणाचं आव्हान, जाणून घ्या

Vijay Hazare Trophy 2025-26: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार संपला आहे. आता 12 जानेवारीपासून क्वार्टर फायनल फेरीला सुरुवात होणार आहे. या फेरीत मुंबई, कर्नाटक, पंजाबसह आणखी कोणत्या संघांनी प्रवेश केलाय? जाणून घ्या.

VHT 2025-26: क्वार्टर फायनलसाठी 8 संघ फिक्स, मुंबईसमोर कुणाचं आव्हान, जाणून घ्या
Surya Tushar and Atharva Mumbai
Image Credit source: @surya_14kumar x account
| Updated on: Jan 08, 2026 | 11:36 PM

विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 या स्पर्धेत (Vijay Hazare Trophy 2025-2026) 8 जानेवारीला साखळी फेरीतील शेवटचे सामने खेळवण्या आले. मुंबई, महाराष्ट्र दिल्लीसह अनेक संघांनी साखळी फेरीत आपले शेवटचे सामने खेळले. त्यानंतर आता उपांत्य पूर्व अर्थात क्वार्टर फायनलचा थरार रंगणार आहे. या फेरीत एकूण 8 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. या फेरीतील 4 सामने हे 12 आणि 13 जानेवारीला खेळवण्यात येणार आहेत. हे सामने कुठे आणि कधी होणार? तसेच कोणत्या 8 संघांनी उपांत्य पूर्व फेरीत धडक दिलीय? हे जाणून घेऊयात.

VHT 2025-26 उपांत्य पूर्व फेरीसाठी 8 संघ

मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, सौराष्ट्र, विदर्भ आणि पंजाब या 8 संघांनी उपांत्य पूर्व फेरीचं तिकीट मिळवलं आहे. या 8 संघांमध्ये आता उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

सामने कुठे होणार?

उपांत्य पूर्व फेरीतील सर्व सामने हे एकाच ठिकाणी होणार आहेत. उपांत्य पूर्व फेरीतील सामने हे बंगळुरुतील सेंट्रल ऑफ एक्सीलेन्समध्ये आयोजित करण्यात आले आहेत. पहिले 2 सामने हे 12 जानेवारीला होणार आहे. तर शेवटचे 2 सामने हे 13 जानेवारीला खेळवण्यात येणार आहेत.

मुंबईसमोर कर्नाटकाचं आव्हान

मुंबईसमोर क्वार्टर फायलनमध्ये कर्नाटकाचं आव्हान असणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लश्र असणार आहे. या दोन्ही संघांत बहुतांश कॅप्ड खेळाडू आहेत. सूर्यकुमार यादव,शिवम दुबे, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान यासारखे कॅप्ड खेळाडू मुंबई टीममध्ये आहेत. तर देवदत्त पडीक्कल आणि मयंक यादव हे कर्नाटक संघात आहे. त्यामुळे मुंबई विरुद्ध कर्नाटक यांच्यापैकी कोण मैदान मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश आणि दिल्ली विरुद्ध विदर्भ

दुसऱ्या सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध सौराष्ट्र आमनेसामने असणार आहेत. त्यानंतर 13 जानेवारीला पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश आणि दिल्ली विरुद्ध विदर्भ हे सामने होणार आहेत. पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याच्याकडे आहे. पंजाबने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात मुंबईसारख्या तगड्या संघाला पराभूत केलंय. त्यामुळे पंजाबचा विश्वास दुणावलेला असणार आहे. त्यामुळे पंजाब संघ मध्य प्रदेश विरुद्ध कशी कामगिरी करतो, याची उत्सकूता आहे. तसेच यूपी-सौराष्ट्र यांच्यापैकी उपांत्य फेरीचं तिकीट कोणता संघ मिळवणार? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता या 8 संघांपैकी कोणते 4 संघ पुढील फेरीत पोहचणार? यासाठी 13 जानेवारीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.