
विजय हजारे ट्रॉफी 2025 स्पर्धेत दिल्लीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आंध्र प्रदेशला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेशचा डाव गडगडला. 42 धावांवर दोन गडी तंबूत गेले. त्यानंतर शाईक रशीद आणि रिकी भुई यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांमध्ये 92 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर रिकी भुई नितीश रेड्डीसोबत 72 धावांची भागीदारी केली. रिकी भुईच्या 122 धावांच्या जोरावर आंध्र प्रदेशने 8 गडी गमवून 298 धावांपर्यंत मजल मारली आणि विजयासठी 299 धावांचं आव्हान दिलं. दिल्लीने हे आव्हान 6 गडी गमवून पूर्ण केलं. यात विराट कोहलीच्या शतकी खेळीचं योगदान महत्त्वाचं राहिलं. त्याने 101 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकार मारत 131 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे दिल्लीचा विजय सोपा झाला. यासह दिल्ली विजय हजारे ट्रॉफी विजयाची नोंद केली आहे.
विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रियांश आर्य आणि अर्पित राणा ही जोडी मैदानात उतरली होती. पण संघाची अवघी एक धाव असताना अर्पित राणा बाद झाला. त्यामुळे संघाला धक्का बसला. पण प्रियांश आर्य आणि विराट कोहली यांनी दुसर्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली आणि डाव सावरला. प्रियांश आर्य 74 धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि नितीश राणा यांची जोडी जमली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. या भागीदारमुळेच विजय सोपा झाला.
विराट कोहली हा खऱ्या अर्थान चेज मास्टर आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार आहे. 299 धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने 83 चेंडूत शतक ठोकलं. त्याने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले. इतकंच काय तर विराट कोहलीने लिस्ट ए सामन्यात 16 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. विराट कोहलीने या शतकासह फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे त्याला संघातून ड्रॉप करणं आता काही शक्य होणार नाही. शेवटच्या चार वनडे सामन्यात विराट कोहलीने 50हून अधिक धावा केल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतकं ठोकली होती. तर तिसऱ्या वनडे सामन्यात नाबाद 65 धावा केल्या होत्या.