
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमाल केल्यानंतर इशान किशनचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इशान किशनची निवड झाली आहे. असं असताना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर विजय हजारे ट्रॉफीतही त्याने आपला फॉर्म दाखवून दिला आहे. डावखुऱ्या इशान किशनने कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 33 चेंडूत शतक ठोकलं. त्याने 39 चेंडू त 125 धावांची खेळी केली आणि बाद झाला. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी उतरत सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. खरं तर इशान किशन ओपनिंगला उतरतो. पण कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. टी20 वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने त्याने हा निर्णय घेतला. इशान किशन मधल्या फळीत फलंदाजी करत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
कुमार कुशाग्र बाद झाल्यानंतर इशान किशन मैदानात उतरला. उतरल्यानंतर फिरकीपटू श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर थोडा सावध खेळला. पण त्यानंतर मैदानात इशानचं वादळ घोंघावलं. इशान किशनच्या रडारवर विजयकुमार विशाक, अभिलाष शेट्टी, विद्याधर पाटील हे गोलंदाज आले. विजयकुमार विशाकला 11 चेंडूत 40 धावा, अभिलाष शेट्टीला 6 चेंडूत 24 धावा, विद्याधर पाटीलला 7 चेंडूत 25 धावा आल्या. इशान किशनने 33 चेंडूत शतक पूर्ण केलं. यात त्याने 14 षटकार मैदानाच्या चौतर्फा मारले. इतकंच काय तर या शतकी खेळीत त्याने 7 चेंडू निर्धाव खेळले.
शतकी खेळीनंतर इशान किशनचं एक वक्तव्य समोर येत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत झारखंडने जेतेपद मिळवल्यानंतर त्याने केलं होते. जेतेपद मिळाल्यानंतर झारखंड संघाला 2 कोटी 80 लाख मिळाले होते. तेव्हा इशान किशनने सांगितलं होतं की, विजय हजारे ट्रॉफी जिंकल्यानंतर 5 कोटी मिळाले तर जीवाची बाजी लावू. इशान किशनने पहिल्याच सामन्यात आपला हेतू काय ते स्पष्ट करून दाखवलं. सध्या इशान किशनचा फॉर्म पाहता त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळण्याची संधी वाढली आहे.
इशान किशनच्या शतकी खेळीच्या जोरावर झारखंडने 50 षटकात 9 गडी गमवून 412 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 413 धावांचं आव्हान दिलं होतं. पण इशान किशनची ही खेळी व्यर्थ गेली. कारण कर्नाटकने 5 गडी गमवून 47.3 षटकात दिलेले आव्हान गाठलं. देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी झारखंडवर भारी पडली.