
मुंबई क्रिकेट टीमने विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) सलग दुसरा विजय मिळवला आहे. मुंबईने जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये आयोजित सामन्यात उत्तराखंडवर 51 धावांनी मात करत हा सामना आपल्या नावावर केला. मुंबईने उत्तराखंडसमोर 332 धावांचं आव्हान ठेवलं होतं. उत्तराखडंने या विजयी धावांचा पाठलाग करताना तीव्र प्रतिकार केला. मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर उत्तराखंडचे प्रयत्न अपुरे ठरले. उत्तराखंडला 50 ओव्हमध्ये 9 विकेट्स गमावून 280 धावांपर्यंतच पोहचता आलं. भारताने अशाप्रकारे हा सामना आपल्या नावावर केला. उत्तराखंडसाठी ओपनर युवराज चौधरी याने सर्वाधिक धावा केल्या. युवराजने 100 च्या स्ट्राईक रेटने 4 फोर आणि 4 सिक्ससह 96 रन्स केल्या. जगदीश सुचिथ याने 43 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. कॅप्टन कुणाल चंदेला याने 32 धावा जोडल्या. या व्यतिक्त एकालाही 30 पार पोहचता आलं नाही.
मुंबईसाठी एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी दोघांचा अपवाद वगळता सर्वांना यश आलं. कॅप्टन शार्दूल ठाकुर, मुशीर खान आणि शहापूरकर ओंकार तारमाळे या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. ओंकारने 7 ओव्हर बॉलिंग केली. ओंकारने या 7 ओव्हरमध्ये 5.70 च्या इकॉनमीने 40 रन्स देत 2 विकेट्स मिळवल्या.
ओंकारला सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या आगामी मोसमासाठी नुकत्याच झालेल्या मिनी ऑक्शनमधून 30 लाख या किंमतीत घेतलं होतं. तसेच मुंबईसाठी शम्स मुलानी आणि तनुष कोटीयन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
त्याआधी उत्तराखंडने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने 7 विकेट्स गमावून 331 धावा केल्या. मुंबईला 331 धावांपर्यंत पोहचवण्यात हार्दिक तामोरे याने प्रमुख भूमिका बजावली. तसेच हार्दिकला शम्स मुलानी याने चांगली साथ दिली. त्याआधी मुशीर खान आणि सर्फराज खान भावांनी शतकी भागीदारी करुन मुंबईचा डाव सावरला. सर्फराज आणि मुशीर या दोघांनी अर्धशतक ठोकलं.
हार्दिक तामोरे याने सर्वाधिक आणि नाबाद 93 धावा केल्या. मुशीर खान आणि सर्फराज खान या भावांनी प्रत्येकी 55 धावांची खेळी साकारली. शम्स मुलानी याने 48 धावांचं योगदान दिलं. हार्दिक तामोरे आणि शम्स या जोडीने सातव्या विकेटसाठी केलेल्या 95 धावांच्या भागीदारीमुळे मुंबईला 331 धावांपर्यंत पोहचता आलं.