Cricket : विराट-रोहित चाहत्यांना मोठा झटका; एका निर्णयामुळे फॅन्सची निराशा! काय झालं?

Rohit Sharma and Virat Kohli VHT 2025 2026 : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 या मोसमात एकूण 38 संघांमध्ये 119 सामने खेळवण्यात येणार आहेत. एलिट ग्रुपमध्ये 32 तर प्लेट गटात 6 संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली ही टीम इंडियाची स्टार जोडीही खेळणार आहे.

Cricket : विराट-रोहित चाहत्यांना मोठा झटका; एका निर्णयामुळे फॅन्सची निराशा! काय झालं?
Rohit Sharma and Virat Kohli
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 24, 2025 | 1:46 AM

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या अशा विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेला बुधवारी 24 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह टीम इंडियातील अनेक स्टार खेळाडूही या स्पर्धेत खेळणार आहेत. रोहित शर्मा मुंबईचं प्रतिनिधित्व करणार आहे. तर विराट कोहली दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत यंदा एलीट ग्रुप,प्लेट ग्रुप आणि नॉकआऊट फेरीतील सामने होणार आहेत. या स्पर्धेतील सामने हे त्रयस्थ (Neutral) ठिकाणी होणार आहेत. या स्पर्धेचा थरार जवळपास महिनाभर रंगणार आहे. अंतिम सामना हा 18 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

रोहित आणि विराट फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत असल्याने त्यांना पाहण्याची संधी फार कमी मिळते. त्यामुळे रोहित आणि विराट या स्पर्धेत खेळणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र त्यांची एका निर्णयामुळे घोर निराशा झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित आणि विराटचे सामने चाहत्यांना टीव्ही-मोबाईलवर दाखवण्यात येणार नाहीत.

फक्त 2 सामनेच दाखवण्यात येणार!

स्टार स्पोर्ट्स आणि जिओहॉटस्टार हे बीसीसीआयचे ब्रॉडकास्टर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टार आणि जिओ हॉटस्टारकडून बुधवारी 24 डिसेंबरला फक्त 2 सामनेच लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत. पुड्डेचरी विरुद्ध तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश विरुद्ध हैदराबाद हे 2 सामनेच लाईव्ह दाखवण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे.

रोहित-विराटची टीम कुणाविरुद्ध खेळणार?

विराटची टीम दिल्ली डी या एलीट ग्रुपमध्ये आंध्रपदेश विरुद्ध खेळणार आहेत. हा सामना बंगळुरुतील सीओएमध्ये होणार आहे. तर रोहितची टीम मुंबई सिक्कीम विरुद्ध  2 हात करणार आहे. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडियातील स्टार खेळणार

बीसीसीआयच्या नियमांनुसार, कॅप्ड खेळाडूंना (टीम इंडियासाठी खेळणारे) या स्पर्धेत किमान 2 सामने खेळणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेत रोहित आण विराट व्यतिरिक्त भारताचे अनेक खेळाडू खेळताना दिसणार आहेत. यामध्ये भारताचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुबमन गिल, विकेटकीपर संजू सॅमसन आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्या आपल्या टीमचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.

स्पर्धेबाबत थोडक्यात

एका ट्रॉफीसाठी 38 संघांमध्ये चुरस असणार आहेत. 38 पैकी 32 एलीट तर 6 संघांचा समावेश प्लेट ग्रुपमध्ये करण्यात आला आहे. या 32 संघांना 8-8 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघाला आपल्या गटातील इतर संघाविरुद्ध 1 असे एकूण 7 सामने खेळायचे आहेत.

1 ट्रॉफी आणि 38 संघ

प्रत्येक गटात पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असणारे 2 संघ उपांत्य पूर्व (Quarter Final) फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम सामना खेळवण्यात येईल. उपांत्य फेरीतील सामने हे 15 आणि 16 जानेवारीला होणार आहेत. तर 18 जानेवारीला अंतिम सामना होईल. तसेच प्लेट ग्रुपमधील 6 संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.