Vinod Kambli Birthday: विनोद कांबळीचा निवृत्तीच्या 30 वर्षांनंतरही महारेकॉर्ड आजही कायम, नक्की विक्रम काय?

Vinod Kambli Unbroken Cricket Record : भारताचा माजी कसोटी फलंदाज विनोद कांबळी याने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये झंझावाती खेळी करुन महारेकॉर्ड केला होता. कांबळीचा हा विक्रम त्याच्या निवृत्तीच्या 30 वर्षांनंतरही कायम आहे.

Vinod Kambli Birthday: विनोद कांबळीचा निवृत्तीच्या 30 वर्षांनंतरही महारेकॉर्ड आजही कायम, नक्की विक्रम काय?
Vinod Kambli 54th Birthday
Image Credit source: INSTAGRAM
| Updated on: Jan 18, 2026 | 5:09 PM

भारताचा माजी फलंदाज आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा खास मित्र विनोद कांबळी याचा आज (18 जानेवारी) 54 वा वाढदिवस आहे. सचिनप्रमाणे कांबळीनेही त्याचा काळ गाजवलाय. सचिन आणि कांबळी या दोघांची जवळपास सारखीच सुरुवात झाली. कांबळीने ज्या पद्धतीने सुरुवातीची काही वर्ष खेळ दाखवला ते पाहता तो मोठा क्रिकेटपटू होणार, असं म्हटलं जात होतं. तसेच कांबळी सचिनपेक्षा सरस होता, असंही क्रिकेटमधील जाणते म्हणतात. मात्र कांबळी सचिनप्रमाणे सातत्य राखण्यात अपयशी ठरला. तसेच कांबळी चुकीच्या मार्गावर गेला. कांबळीला सातत्य न राखणं आणि वाईट सवयी करियरच्या हिशोबाने फार महागात पडल्या.

कांबळीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊन 30 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. मात्र त्यानंतरही कांबळीचा महारेकॉर्ड आजही कायम आहे. कांबळीचा विक्रम मोडीत काढणं भल्या-भल्या फलंदाजांना जमलेलं नाही. कांबळीचा तो विक्रम नक्की काय आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

विनोद कांबळीचा कसोटीत झंझावात

कांबळीने कसोटी क्रिकेटमध्ये दणक्यात सुरुवात केली होती. कांबळीने पहिल्या 7 कसोटी सामन्यांमध्येच 4 शतकं झळकावली होती. विशेष म्हणजे यात 2 द्विशतकांचा समावेश होता. कांबळीने या तडाख्यासह भारतासाठी कसोटीत वेगवान 1 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली होती. विनोदने 14 डावांत कसोटीत 4 आकडी धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र तेव्हापासून एकाही भारतीयाला कांबळीला मागे टाकणं जमलेलं नाही. मुंबईकर यशस्वी जैस्वाल कांबळीच्या या विक्रमाजवळ आला होता. मात्र यशस्वीलाही ते जमलं नाही. यशस्वीने 16 डावांत 1 हजार कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या.

कांबळीची कसोटी कारकीर्द

कांबळीने भारतासाठी 1991 साली एकदिवसीय पदार्पण केलं होतं. तसेच 2000 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. कांबळीने 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 हजार 477 धावा केल्या होत्या. तसेच कांबळीने 17 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 1 हजार 84 धावा केल्या आहेत. कांबळीने या दरम्यान 2 द्विशतकं, 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत.

कांबळीचा आजारासह सामना

कांबळी गेल्या काही वर्षांपासून तब्येतीसह झगडत आहे. कांबळीच्या भावाने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, माजी क्रिकेटपटूची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं होतं. मात्र तेव्हापासून कांबळीच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती नाही.

डिसेंबर 2024 मध्ये दादरमधील शिवाजी महाराज पार्कात दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकराचं अनावरण करण्यात आलं होतं. या विशेष कार्यक्रमाला आचरेकर सरांचे अनेक शिष्य उपस्थित होते. तेव्हा कांबळीही या कार्यक्रमाला उपस्थित होता. या कार्यक्रमातून कांबळीची प्रकृती स्थिर नसल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर कांबळी गंभीर आजारासह झगडत असल्याचं सर्वांसमोर आलं. मात्र त्यानंतर कांबळीच्या आवश्यक उपचारासाठी अनेक दिग्गजांनी मदतीचा हात पुढे केला. त्यानंतर कांबळीने नको त्या गोष्टींचा त्याग केला होता. तसेच कांबळीने मी फायटर आहे, मी लवकरच कमबॅक करेन, असा विश्वास एका मुलाखतीतून व्यक्त केला होता.