Team India : रोहित-विराट एकदिवसीय सामने केव्हा खेळणार? या बैठकीत होणार निर्णय

Rohit Sharma and Virat Kohli : विराट कोहली आणि रोहित शर्मा भारताच्या अनुभवी जोडीने काही महिन्यांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर त्याआधी दोघांनीही टी 20i ला अलविदा केला होता. त्यामुळे आता हे दोघे फक्त वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे या दोघांच्या कमबॅकची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा लागून आहे.

Team India : रोहित-विराट एकदिवसीय सामने केव्हा खेळणार? या बैठकीत होणार निर्णय
Virat Kohli and Rohit Sharma Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 19, 2025 | 4:58 PM

रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी भारतीय क्रिकेटपटू जोडीने टी 20i नंतर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. त्यामुळे आता हे दोघे फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या दोघांच्या मैदानातील कमबॅकची प्रतिक्षा आहे. मात्र टीम इंडिया पुढील वनडे सीरिज केव्हा खेळणार? याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र बीसीसीआय याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते. येत्या 2 दिवसांनंतर आयसीसीच्या वार्षिक बैठकीत बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट होणार आहे. या बैठकीत एकदिवसीय मालिकेबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेटमध्ये होणार निर्णय

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेचा शेवट 2 ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार होता. मात्र हा दौरा वर्षभरासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतर श्रीलंकेने बीसीसीआयसमोर प्रत्येकी 3-3 सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी 20i मालिकेचा प्रस्ताव ठेवला. मात्र याबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सिंगापूरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत या मालिकेबाबत निर्णय होईल, असा विश्वास श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आहे.

आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या एक अधिकाऱ्याने टेलिकॉम आशिया स्पोर्टला दिली. येत्या 2-3 दिवसात याबाबत निर्णय होण्याची आशा आहे. रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानुसार श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेबाबत लवकरच निर्णय घेऊ, मात्र मालिका होण्याबाबत अवघड वाटत आहे.

भारतीय क्रिकेट संघाने शेवटचा एकदिवसीय सामना हा 9 मार्च 2025 रोजी खेळला होता. हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा महाअंतिम सामना होता. भारताने या सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात करत 12 वर्षांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर भारतीय संघाचा एकही एकदिवसीय सामना झालेला नाही.

2025 मध्ये फक्त 6 एकदिवसीय सामने

दरम्यान टीम इंडिया 2025 या वर्षात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी 3-3 असे एकूण 6 एकिदवसीय सामने खेळणार आहे. त्याआधी बांगलादेश दौरा स्थगित करण्यात आला आहे. तर श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी 20i मालिका नियोजित आहे. आता या मालिकेबाबत काय निर्णय होतो यावर रोहित आणि विराट मैदानात दिसणार की नाही? हे निश्चित होईल.