Video: कोहलीचा हा व्हिडिओ बंगळुरूतील चेंगराचेंगरीचे कारण? घटनेच्या 7 तास आधीच सांगितलं होतं की…

आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या जेतेपदाचं स्वप्न प्रत्येक फ्रेंचायझीचं असतं. असं असताना 17 वर्षानंतर आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं. पण त्या विजयी आनंदावर चेंगराचेंगरीमुळे विरजण पडलं. त्यात 11 जणांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणाचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

Video: कोहलीचा हा व्हिडिओ बंगळुरूतील चेंगराचेंगरीचे कारण? घटनेच्या 7 तास आधीच सांगितलं होतं की...
कोहलीचा हा व्हिडिओ बंगळुरूतील चेंगराचेंगरीचे कारण? घटनेच्या 7 तास आधीच सांगितलं होतं की...
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 17, 2025 | 5:54 PM

आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जिंकलं. अंतिम फेरीत पंजाब किंग्सचा पराभव करून 17 वर्षानंतर 18 व्या पर्वात हे जेतेपद मिळवलं. त्यामुळे आरसीबी चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. पराभवाची सळ इतकी वर्षे सोसत असल्याने विजय काय असतो याचा आरसीबीचे चाहते सर्वात चांगल्या प्रकारे सांगू शकतात. पण या विजयाला दुसऱ्या दिवशीच गालबोट लागलं. विजयी कप घेऊन आरसीबी संघ बंगळुरुला परतला आणि चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. यात 11 जणांचा मृत्यू झाला, तर 50हून अधिक जण जखमी झाले. यानंतर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर कर्नाटक सरकारच्या अहवालात फ्रेंचायझीला दोषी धरलं गेलं आहे. यात आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीच्या व्हिडीओचा उल्लेख करण्यात आला आहे. या व्हिडीओत विराट कोहलीने असं काय म्हंटलं की, त्याचा संदर्भ आता दुर्घटनेशी जोडला जात आहे? कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून कोर्टाच्या आदेशानंतर हा अहवाल सार्वजनिक केला आहे.

कर्नाटक सरकारने सादर केलेल्या अहवालात या प्रकरणासाठी पूर्णपणे आरसीबीला जबाबदार धरण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, आरसीबीच्या विजयी परेडची सोशल मीडियावरील घोषणा, एक दिवस आधी विजयी रॅलीसाठी परवानगी यांचा उल्लेख अहवालात केला आहे. बंगळुरु पोलिसांनी या विजयी रॅलीला परवानगी नाकारली होती. या अहवालात विराट कोहलीच्या नावाचाही उल्लेख आहे. यात एक व्हिडीओ आरसीबीने पोस्ट केला होता. त्याचा या रिपोर्टमध्ये संदर्भ देण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, आरसीबीकडून 4 जून रोजी सकळी 8 वाजून 54 मिनिटांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात विराट कोहली चाहत्यांसोबत विजयोत्सव साजरा करण्याचं सांगत आहे. पण या व्हिडीओत नेमकं काय आहे? कोहलीने नेमकं काय सांगितलं?.

आरसीबीने पोस्ट केलेला व्हिडीओ अजूनही एक्स खात्यावर आहे. यात विराट कोहली सांगत आहे की, “उद्या (४ जून) बंगळुरू पोहोचल्यावर मी त्याची (विजयाची भावना) वास्तविकता अनुभवू शकेन आणि शहर आणि चाहत्यांसोबत आनंद साजरा करू शकेन, जे नेहमीच चांगल्या आणि वाईट काळात आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत.” हा व्हिडीओ बंगळुरुच्या विजयानंतर रात्री ड्रेसिंग रुममध्ये शूट केला होता. याचा अर्थ असा की, कोहलीसहीत इतर खेळाडूंना बंगळुरुतील विजयी रॅलीचा अंदाज होता. पण पोलिसांनी परवानगी दिली की नाही ते खेळाडूंना माहिती होतं की नाही ते मात्र कळू शकलं नाही.