
आयपीएल 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना एकतर्फी झाला. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला डोकं वर काढू दिलं नाही. एकापाठोपाठ एक विकेट घेत संपूर्ण डाव 113 धावांवर आटोपला. विजयासाठी मिळालेल्या 114 धावांचं आव्हान कोलकात्याने 2 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह कोलकात्याने तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. पण असं असताना ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीच किंग ठरला. त्याच्या आसपासही कोणी पोहोचू शकलं नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ऑरेंज कॅपचा मानकरी विराट कोहली होता. त्याला कोणीतरी धोबीपछाड देईल अशी शक्यता देखील नव्हती. सनरायझर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नरीन यांना संधी होती खरी पण तसं काही घडलं नाही. शेवटच्या त्याच्या बॅटची धार कमी झाली. इतकंच काय तर ट्रेव्हिस हेडला दोन वेळेस आपलं खातंही खोलता आलं नाही. सुनील नरीनचंही तसंच काहीसं झालं. चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान तर साखळी फेरीतच संपुष्टात आल्याने ऋतुराज गायकवाडला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
विराट कोहलीने 15 सामन्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांच्या जोरावर 741 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड 583 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग 573 धावांसह तिसऱ्या आणि सनरायझर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड 567 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन 531 धावांसह पाचव्या स्थानावर राहिला आहे. त्यामुळे विराट कोहलीच ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.
दुसरीकडे, अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला. पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसला. सनरायझर्सला आयपीएल स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्येवर रोखण्यात कोलकाता नाईट रायडर्सला यश आलं. हैदराबादने फक्त 113 धावा केल्या आणि विजयासाठी 114 धावांच आव्हान दिलं. हे आव्हान कोलकाता नाईट रायडर्सने 2 गडी गमवून सहज पूर्ण केलं. यासह कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर या जोडीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे.