विराट कोहली कर्णधारपद सोडणार, आता T20 चं नेतृत्त्व कोण करणार?

| Updated on: Sep 16, 2021 | 6:40 PM

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली.

विराट कोहली कर्णधारपद सोडणार, आता T20 चं नेतृत्त्व कोण करणार?
Follow us on

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, टी -20 विश्वचषकानंतर यापुढे तो टी -20 संघाचा कर्णधार राहणार नाही. टी -20 संघाचा कर्णधार म्हणून त्याची ही शेवटची स्पर्धा असेल. तथापि, तो टी -20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळत राहील. (Virat Kohli steps down as India’s T20 captain)

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही तो कर्णधार राहील. कोहलीने कर्णधारपद सोडल्याच्या बातम्या अलीकडेच समोर आल्या होत्या. यामध्ये असे म्हटले होते की कोहली टी -20 विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडेल. पण बीसीसीआयने लगेच हे वृत्त फेटाळले. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुण धुमाळ दोघांनीही सांगितले होते की, कर्णधारपदामध्ये कोणताही बदल होणार नाही. जोपर्यंत संघ चांगली कामगिरी करत आहे तोपर्यंत असे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 45 टी -20 सामने खेळले आहेत आणि त्यातील 29 सामने जिंकले आहेत. केवळ 13 सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे, तर दोन सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या विजयाची टक्केवारी 65.11 इतकी आहे. 2017 च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो टी – 20 संघाचा कर्णधार बनला. तसेच, 2021 टी 20 विश्वचषक ही त्याची कर्णधार म्हणून पहिली आयसीसी टी-20 स्पर्धा असेल. या स्पर्धेनंतर कोहली कर्णधारपदावरून पायउतार होईल. दरम्यान, विराट कोहलीनंतर भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद आक्रमक फलंदाज रोहित शर्माकडे सोपवलं जाईल, अशी चर्चा आहे.

विराट कोहलीची पोस्ट जशीच्या तशी

मी तसा पुरेसा नशिबवान आहे की, मला फक्त भारताचं प्रतिनिधीत्वच करायला मिळालं असं नाही तर टीम इंडियाला पूर्ण क्षमतेसह लीडही करता आलं. भारताचा कर्णधार होण्यापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला सपोर्ट केला त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. त्यांच्याशिवाय मला हे करता येणं शक्य नव्हतं. त्या प्रत्येकाचे म्हणजे टीममधले सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे कोचेस, तसच प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीचे ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रार्थना केली त्यांचेही आभार.

वर्कलोड समजणं ही एक महत्वाची बाब आहे. गेल्या 8-9 वर्षापासून तीनही फॉरमॅटमध्ये खेळणं तसेच सातत्यानं 5-6 वर्षापासून कॅप्टन्सी करणं हा अती वर्कलोड आहे. याच पार्श्वभूमीवर मला आता असं वाटतं की टीम इंडियाला वन डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पूर्ण क्षमतेनं लीड करण्यासाठी मी स्वत:ला स्पेस देणं गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून मी टी-20 क्रिकेटला सर्व काही दिलंय आणि पुढेही फलंदाज म्हणून देत राहीन.

अर्थातच, या निर्णयापर्यंत येण्यासाठी खूप वेळ घेतला. माझ्या जवळच्या लोकांशी यावर सविस्तर चर्चा केली. रवी भाई (रवी शास्त्री) आणि रोहित शर्मा यांच्याशी बोललो. हे दोघेही नेतृत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्याशी बोलून मी दुबईत होत असलेल्या टी-20 विश्वचषकानंतर टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मी बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही या विषयावर चर्चा केली. यापुढेही मी माझ्या पूर्ण क्षमतेने भारतीय क्रिकेट आणि भारतीय टीमची सेवा करत राहीन.

इतर बातम्या

T20 वर्ल्डकपमधून काढल्यानंतर या भारतीय गोलंदाजाची कामगिरी सुधारली, आता म्हणतो, जुना युजी परतला!

राजस्थान रॉयल्सला मिळाला 38 सिक्सर ठोकणारा धुरंधर, IPL 2021 मध्ये आता तुफान येणार!

शार्दुल ठाकूरची बँटिंग इतकी कशी सुधारली, टीम इंडियातील दोन शिलेदारांची मदत, वाचा इनसाईड स्टोरी

(Virat Kohli steps down as India’s T20 captain)