NZ vs ENG : क्रिकेट वेड्या देशात रिकामं स्टेडियम पाहून वीरेंद्र सेहवाग आश्चर्यचकीत, ट्वीट करत दिली अशी ‘आयडिया’

ODI World Cup 2023, NZ vs ENG : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण प्रेक्षकांनी या सामन्याकडे पाठ फिरवल्याचं दिसलं.

NZ vs ENG : क्रिकेट वेड्या देशात रिकामं स्टेडियम पाहून वीरेंद्र सेहवाग आश्चर्यचकीत, ट्वीट करत दिली अशी आयडिया
NZ vs ENG : अरे रे..! इंग्लंड न्यूझीलंड सामन्यात रिकाम्या खुर्च्यांनी वेधलं लक्ष, वीरेंद्र सेहवाग म्हणाला...!
| Updated on: Oct 05, 2023 | 5:24 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं 13 वं पर्व आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं संपूर्ण आयोजन भारताने केलं आहे. स्पर्धेतील पहिला सामना गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. गजविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात हा सामना होत आहे. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत क्षेत्ररक्षणाची निवड केली. न्यूझीलंडचा हा निर्णय अनेकांना आश्चर्यकारक वाटला. कारण पाटा विकेटवर 300 हून अधिक धावांचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना वेसण घातलं. तसेच 300 च्या आता धावा ठेवण्यास यश मिळवलं. पण वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उद्घाटन सोहळ्याचा हा सामना एकदम फिका वाटला. कारण प्रेक्षकांनी या सामन्याकडे पाठ फिरवल्याचं दिसलं. जगातील सर्वात मोठं मैदान निम्म्यााहून अधिक रिकामी असल्याचं दिसलं.

रिकामी मैदान पाहून सोशल मीडियावर आता चर्चा रंगली आहे. क्रीडाप्रेमींनी या सामन्याकडे का पाठ फिरवली असेल असा प्रश्नही विचारला जात आहे. दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने आपलं मत व्यक्त केलं आहे. प्रेक्षकांना मैदानापर्यंत आणण्यासाठी काय करावं? यासाठी त्याने एक आयडिया दिली आहे. ट्विटरवर त्याने याबाबत मोकळेपणाने मत मांडलं आहे.

काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?

“आशा आहे की, ऑफिस सुटल्यानंतर लोकं मैदानात सामना पाहण्यासाठी येतील. भारत सोडून इतर सामन्यांची तिकीटं शाळा आणि कॉलेजमधील मुलांना मोफत द्यायला हवी. 50 षटकांच्या खेळातील रस कमी झाल्याने तरुणांना विश्वचषक खेळाचा अनुभव घेण्यास मदत होईल. खेळाडूंना पूर्ण स्टेडियमसमोर खेळण्यास मदत होईल.”, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट