आक्रमक फिल सॉल्टला बाद करण्यात विराट कोहलीचा हात? रनआऊटच्या व्हिडीओवरून रंगली चर्चा! तुम्हीच ठरवा आता

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आपल्याच होमग्राउंडवर दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पराभवाची बरीच कारणं सांगितली जात आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे फिल सॉल्टचं रनआऊट होणं. त्याच्या रनआऊटसाठी आता विराट कोहलीला जबाबदार धरलं जात आहे. तुम्हीही व्हिडीओ पाहून काय ते ठरवा.

आक्रमक फिल सॉल्टला बाद करण्यात विराट कोहलीचा हात? रनआऊटच्या व्हिडीओवरून रंगली चर्चा! तुम्हीच ठरवा आता
| Updated on: Apr 11, 2025 | 3:41 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि अक्षर पटेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने मोठी धावसंख्येच्या दिशेने कूच केली. तिसऱ्या षटकातच 50 धावांचा आकडा गाठला होता. फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने आक्रमक सुरुवात करून दिली होती. पण एका झटक्यात या आक्रमक खेळीनंतर निराशा आली. विराट कोहलीच्या चुकीच्या कॉलमुळे फिल सॉल्टला विकेट गमवावी लागल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हा प्रकार घडला. खरं तर सॉल्टची आक्रमक खेळी पाहून आधीच दिल्लीच्या गोलंदाजांना घाम फुटला होता. पण एक चूक आणि त्याला मैदानाबाहेर जावं लागलं.

अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर फिल सॉल्टने डीप कव्हरकडे चेंडू मारला. यानंतर सहज एक धाव होईल या हेतूने धाव घेतली. त्याच्या कॉलला विराट कोहलीनेही दाद दिली. दोघंही खेळपट्टीच्या मधोमध पोहोचले असताना विराटने निर्णय बदलला आणि धावण्यास नकार दिला. यामुळे फिल सॉल्टला मागे फिरण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तिथेच सर्व काही फसलं आणि पाय घसरून पडला. त्यामुळे क्रिझवर पोहोचू शकला नाही. फिल सॉल्टला रनआऊट होत तंबूत परतावं लागलं. फिल सॉल्टने अवघ्या 17 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारून 37 धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याची विकेट दिल्ली कॅपिटल्सला आयती मिळाली.

फिल सॉल्ट धावबाद झाल्याचे पाहून सोशल मीडियावरील काही युजर्सने आपला राग व्यक्त केला आहे. या चुकीसाठी विराट कोहलीला त्यांना जबाबदार धरलं आहे.एका युजर्सने लिहिले की, “एकदिवसीय विश्वचषकात सूर्यकुमार असाच धावबाद झाला, भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीत ऋषभ पंतसोबत असंच केलं, तिसऱ्या कसोटीत शुबमन गिल, बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत जयस्वाल आणि आता कोहलीने फिल साल्टला धावबाद केले आहे.”