ENG vs IND : वॉशिंग्टन सुंदरची स्फोटक खेळी, यशस्वीचं शतक, इंग्लंडसमोर 374 धावांचं आव्हान, भारत जिंकणार?

Washinton Sundar England vs India 5th Test : वॉशिंग्टन सुंदर याने अखेरच्या काही षटकांत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत स्फोटक अर्धशतक ठोकलं. त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात 396 धावांपर्यंत मजल मारता आली.

ENG vs IND : वॉशिंग्टन सुंदरची स्फोटक खेळी, यशस्वीचं शतक, इंग्लंडसमोर 374 धावांचं आव्हान, भारत जिंकणार?
Yashasvi Jaiswal and Washington Sundar
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Aug 02, 2025 | 11:12 PM

ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याने अखेरच्या क्षणी केलेलं झंझावाती अर्धशतक तसेच यशस्वी जैस्वाल याच्या शतकाच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी इंग्लंडसमोर 374 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडकडे पहिल्या डावात 23 धावांची आघाडी होती. भारताने ही आघाडी फोडत दुसऱ्या डावात 88 षटकांत सर्वबाद 396 धावा केल्या आहेत. भारतासाठी यशस्वी, वॉशिंग्टन व्यतिरिक्त आकाश दीप आणि रवींद्र जडेजा या जोडीने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताला 390 पार मजल मारता आली. आता भारतीय गोलंदाज इंग्लंडला गुंडाळत मालिकेत 2-2 ने बरोबरी साधण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

भारताचा दुसरा डाव

भारतासाठी ओपनर यशस्वी जैस्वाल याने दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा केल्या. यशस्वीने या मालिकेतील दुसरं शतक ठोकलं. यशस्वी 118 धावा करुन बाद झाला. तसेच नाईट वॉचमॅन म्हणून आलेल्या आकाश दीपने कमाल केली. आकाशने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. आकाशने 94 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 66 धावा केल्या. तसेच रवींद्र जडेजा याने 53 धावांचं योगदान देत या मालिकेत आणखी एक अर्धशतक झळकावलं.

वॉशिंग्टन सुंदर याने प्रसिध कृष्णा याच्यासोबत दहाव्या आणि शेवटच्या विकेटसाठी स्फोटक अर्धशतकी भागदारी केली. वॉशिने या दरम्यान वैयक्तिक अर्धशतक झळकाववलं. वॉशिने नाबाद 53 धावा केल्या. तर इंग्लंडसाठी जोश टंग याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. गस एटकीन्सन याने 3 विकेट्स घेतल्या. तर जेमी ओव्हरटन याने भारताच्या 2 फलंदाजांना बाद केलं.

यशस्वीची शतकी खेळी

टीम इंडिया जिंकणार?

टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखायचं असेल तर भारताला हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे भारताकडे ही मालिका बरोबरीत सोडवण्याची सुवर्ण संधी आहे. लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कधीही 273 धावांचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. भारताने 2021 साली याच मैदानात 368 धावांचं आव्हान देत हा सामना जिंकला होता. त्यामुळे आता टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवणार की इंग्लंड इतिहास रचत मालिका नावावर करणार? हे येत्या काही तासांतच स्पष्ट होईल.