
वनडे टीम इंडियाचा उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर याच्यावर दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. टी 20i टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबईकर सहकारी सूर्यकुमार यादव याने श्रेयस आता बरा असल्याची माहिती दिली. श्रेयसला 25 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कॅच घेताना दुखापत झाली होती. श्रेयसने सामन्यातील पहिल्या डावात उलट दिशेने धावत ऑस्ट्रेलियाच्या एलेक्स कॅरी याचा अप्रतिम कॅच घेतला. श्रेयस कॅच घेताना आपटला. त्यामुळे श्रेयसच्या बरगड्यांना दुखापत झाली. श्रेयसच्या बरगड्यातून रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्यामुळे श्रेयसला तातडीने सिडनीतील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्रेयसला अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आल्याने चिंता वाढली होती. मात्र श्रेयसला आयसीयूतुन काढण्यात आलं. श्रेयसवर शस्त्रक्रियाही पार पडली. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे.
श्रेयसच्या शस्त्रक्रियेनंतर अय्यर कुटुंबातून मोठी अपडेट आली आहे.श्रेयसच्या दुखापतीची माहिती मिळताच क्रिकेटपटूच्या कुटुंबियांनी तातडीने व्हीजासाठी अर्ज केला. कुटुंबियांनी आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या. व्हीझासाठीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर अय्यर कुटुंबिय सिडनीसाठी रवाना होणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता कुटुंबियांपैकी कुणीही ऑस्ट्रेलियाला जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. श्रेयसचे वडील संतोष अय्यर यांनी ही माहिती दिली आहे.
श्रेयसच्या तब्येतीबाबतही त्याच्या वडिलांनी माहिती दिली आहे. श्रेयस आता ठीक आहे. तो लवकरच भारतात परतु शकतो, असा विश्वास संतोष अय्यर यांनी व्यक्त केला.
“बीसीसीआयकडून श्रेयसवर लक्ष दिलं जात आहे. श्रेयस बरा होत आहे. सिडनीतील सर्वोत्तम डॉक्टर श्रेयसवर उपचार करत आहेत. श्रेयसला या आठवड्याच्या शेवट किंवा त्याआधी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. श्रेयस टी 20I मालिकेचा भाग नसल्याने तो लवकर परतणार आहे. तसेच आम्ही सिडनीला जाणार नाहीत”, अशी माहिती संतोष अय्यर यांनी ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिली.
टीम इंडियाने तिसरा आणि अंतिम सामना 9 विकेट्सने जिंकून ऑस्ट्रेलियाला क्लिन स्वीप करण्यापासून रोखलं. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 ने जिंकली. श्रेयस अय्यर याने या मालिकेतील पहिल्या सामन्यांत बॅटिंग केली. श्रेयस पहिल्या सामन्यात 11 धावांवर बाद झाला. तर दुसर्या सामन्यात निर्णायक क्षणी रोहित शर्मा याच्यासह शतकी भागीदारी केली. श्रेयसने दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. श्रेयसने 61 धावा केल्या. श्रेयसने अशाप्रकारे 2 सामन्यांमध्ये एकूण 72 धावा केल्या.