
वेस्टइंडिजचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विंडीच्या या खेळाडूवर 11 महिलांकडून अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विंडीज सध्या मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेदरम्यान हे प्रकरण समोर आलं आहे. आता या प्रकरणावर विंडीजचा हेड कोच आणि माजी कर्णधार डॅरेन सॅमी याने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात न्याय मिळणं खूप महत्वाचं आहे. जे काही सत्य असेल ते समोर यायला हवं, असं सॅमीने म्हटलं.
“मला या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती नाही. मात्र आम्हाला माध्यमांत जे काही सुरु आहे त्याबाबत माहित आहे. खेळाडूंची मानसिक स्थिती चांगली रहावी यासाठी मी त्यांच्यासोबत संवाद साधत आहे”, असं सॅमीने म्हटलं.
“आमचा न्याय यंत्रणेवर विश्वास आहे. आम्ही न्यायावर विश्वास ठेवतो. न्याय मिळावा, असं आमच्या समुहाला वाटतं. मात्र त्यासाठी एक प्रक्रिया आहे. हे संपूर्ण प्रकरण यंत्रणेद्वारे निकाली निघावं. एक कोच आणि क्रिकेट बोर्ड म्हणून सर्वांसोबत न्याय व्हावा, हेच मला अपेक्षित आहे”, असंही सॅमीने स्पष्ट केलं.
“शामरवर आरोप करण्यात आले आहेत. न्यायासाठी एक प्रक्रिया असते आणि त्यासाठी वेळ लागतो, याबाबत आम्हाला माहित आहे. त्यामुळे खरं काय ते समोर येण्यासाठी आम्हाला प्रतिक्षा करावी लागेल”, असं विंडीच्या हेड कोचने सांगितलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शामर जोसेफ याच्यावर 11 महिलांकडून लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोसेफने 3 मार्च 2023 रोजी न्यू अॅमस्टरडॅममध्ये माझ्यासह गैरवर्तन केलं. तसेच शामरने मला हे प्रकरण दाबण्यासाठी पैशांचीही ऑफर दिली होती, असा आरोप एका पीडितीने केला. मात्र या प्रकरणात अजून कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत.
दरम्यान ऑस्ट्रेलिया विंडीज दौऱ्यात कसोटी आणि टी 20i मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा 3 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 12 जुलैपासून होणार आहे. त्यानंतर 20 ते 28 जुलै दरम्यान उभयसंघात 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे.