ENG vs WI : इंग्लंडचं विंडिजसमोर 142 धावांचं आव्हान, कोण पोहचणार सेमी फायनलमध्ये?

England Women vs West Indies : इंग्लंडने वेस्ट इंडिजला विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्याच्या निकालावर इंग्लंड, विंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी कोण उपांत्य फेरीत पोहचणार हे स्पष्ट होणार आहे.

ENG vs WI : इंग्लंडचं विंडिजसमोर 142 धावांचं आव्हान, कोण पोहचणार सेमी फायनलमध्ये?
Nat Sciver Brunt fifty
Image Credit source: Icc X Account
| Updated on: Oct 15, 2024 | 9:50 PM

आयसीसी वूम्नस टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीतील 20 व्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडने विंडिजला विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 141 धावा केल्या. इंग्लंडसाठी नॅट स्कायव्हर-ब्रंट हीने सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला विंडिजसमोर सन्माजनक आव्हान ठेवता आलं. बी ग्रुपमधून उपांत्य फेरीसाठी आता इंग्लंड, विंडिजसह दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस आहे. विंडिजला हा सामना जिंकून उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी आहे. या सामन्याचा निकालावर उपांत्य फेरीतील 2 संघ निश्चित होतील. त्यामुळे कोण जिंकतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

इंग्लंडची बॅटिंग

इंग्लंडकडून चौघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. नॅट स्कायव्हर-ब्रंट हीने 50 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 57 धावांची नाबाद खेळी केली. कॅप्टन हीदर नाईट 21 धावा करुन रिटायर्ड हर्ट झाली. डॅनिएल व्याट-हॉज हीने 16 धावांचं योगदान दिल तर माइया बाउचियर हीने 14 धावा केल्या. तर इंग्लंडच्या 6 फलंदाजांपैकी एकीलाही 7 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. विंडिजकडून एफी फ्लेचर हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर कॅप्टन हॅली मॅथ्यूजने 2 विकेट्स घेतल्या. तर डिआंड्रा डॉटिन हीने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

साखळी फेरीतील कामगिरी

दरम्यान इंग्लंड आणि विंडिजचा हा चौथा आणि शेवटचा सामना आहे. विंडिजने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने 3 पैकी 3 सामने जिंकले आहेत. मात्र त्यानंतरही उपांत्य फेरीसाठी चढाओढ आहे. ताज्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता इंग्लंड-विंडिज यांच्यातील विजेता बी ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहचणारा दुसरा संघ ठरेल.

इंग्लंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हीदर नाइट (कॅप्टन), माइया बाउचियर, डॅनिएल व्याट-हॉज, ॲलिस कॅप्सी, नॅट स्कायव्हर-ब्रंट, एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनियल गिब्सन, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन आणि लॉरेन बेल.

वेस्ट इंडिज वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हेली मॅथ्यूज (कॅप्टन), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, चेडियन नेशन, झैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, आलिया ॲलेने, एफी फ्लेचर आणि करिश्मा रामहरक