
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा वरचष्मा दिसून आला. भारताने प्रतिस्पर्धी संघांना डोकंच वर काढू दिलं नाही. इतकंच काय तर पाकिस्तानच्या तीनदा पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर दबाव आणला होता. पॉवर प्लेच्या सहा षटकात भारताचे महत्त्वाचे तीन गडी बाद केले. त्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती. इतकंच काय धावगतीही जास्त असल्याने हा सामना भारताच्या हातून निसटतो की काय असं वाटत होतं. पण तिलक वर्माने संयमी खेळी केली. धावांची गतीही राखली. संजू सॅमसन आणि शिवम दुबेची त्याला साथ मिळाली आणि विजयश्री खेचून आणला. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला. पण विचार करा हा सामना पाकिस्तानने जिंकला असता तर त्यांनी काय केलं असतं. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम सामना जिंकला असता तर पाकिस्तानी खेळाडूंनी तो विजय पाकिस्तानी सैन्याला समर्पित केला असता, असं त्याने सांगितलं.
“अंतिम सामन्यापूर्वी मी त्यांना एक विचार दिला होता. मी त्यांना सांगितले होते की जर ते जिंकले तर त्यांनी तो विजय पाकिस्तान हवाई दलाला समर्पित करावा. पण दुर्दैवाने आम्ही जिंकलो नाही. यामुळे आमचे स्वप्न पूर्ण झाले नाही,” असे शाहिद आफ्रिदी म्हणाला. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला तीनदा पराभूत केलं. त्यामुळे भारताचा हेतू स्पष्ट होता की पाकिस्तानला काहीही करून पराभूत करायचं म्हणजे करायचं. त्यामुळे पाकिस्तानला या स्पर्धेत डोकंच वर काढता आलं नाही. आशिया कप स्पर्धेतील या विजयाची नोंद आता इतिहासात होणार आहे.
दरम्यान, भारताने साखळी फेरीतच पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर हा विजय भारतीय सशस्त्र दल आणि पहलगाम पीडितांना समर्पित केला होता. त्यानंतर पीसीबीने सूर्यकुमारची तक्रार आयसीसीकडे केली होती. अंतिम सामना जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याचे सामना शुल्क भारतीय सैन्याला देण्याचं जाहीर केलं. ‘मी या स्पर्धेतील सर्व सामन्यांमधील माझे सामना शुल्क भारतीय सैन्याला देऊ इच्छितो.’, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.