Ind vs Pak : 42 धावांत 4 विकेट, तरी पाकिस्तानला एकटा भिडला; कोण आहे अर्जुन राजपूत ज्याने भारतासाठी पाडला धावांचा पाऊस
पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ अडचणीत असताना एका तरुण फलंदाजाने मैदानावर किल्ला लढवला. 42 धावांत 4 विकेट पडलेल्या असताना त्याने शतक झळकावले. कोण आहे हा फलंदाज आणि त्याच्या यशामागे काय आहे वडिलांचा संघर्ष?

Who is Arjun Rajput : अंडर-19 आशिया कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात जालंधरच्या अर्जुन राजपूतने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय संघाची अवस्था 42 धावांत 4 विकेट अशी बिकट झाली असताना अर्जुनने मैदानावर पाय रोवले. पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत त्याने अवघ्या 80 चेंडूंमध्ये शतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे भारताला संकटातून बाहेर पडण्यास मदत झाली. मात्र, अर्जुनच्या या यशामागे त्याच्या वडिलांचा मोठा संघर्ष दडलेला आहे. कसा राहिला आहे त्याचा संघर्ष चला तर मग जाणून घेऊयात..
भारताची सुरुवात निराशाजनक
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताला दुसऱ्याच चेंडूवर धक्का बसला. कर्णधार लक्ष्य रायचंदानी खाते न उघडताच बाद झाला. अली रझा आणि मोहम्मद सय्यम यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना संघर्ष करावा लागला. 42 धावांवर भारताने 4 विकेट गमावल्या. अशा परिस्थितीत अर्जुनने डावाची जबाबदारी स्वीकारली. आणि मैदानावर पाय रोवून उभा ठाकला.
80 चेंडूंमध्ये ठोकले शतक
अर्जुनला खेळताना पाहून असं वाटलंच नाही की तो नवीन खेळाडू आहे. त्याला जास्त अनुभव नसूनही त्याने एक अनुभवी खेळ दाखवला. मोठ्या सामन्यामध्ये खेळताना प्रचंड दबाब असतो पण सुरुवातीला संयमी फलंदाजी करणाऱ्या अर्जुनने नंतर आक्रमक पवित्रा घेतला. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर चौकार आणि षटकारांची बरसात केली. अवघ्या 43 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने 80 चेंडूंमध्ये शतक झळकावले. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. अखेर 85 चेंडूंमध्ये 107 धावा करून तो बाद झाला.
वडिलांनी छोले-कुलचे विकून पूर्ण केले स्वप्न
अर्जुनच्या यशामागे त्याचे वडील होटी राम यांचा खूप मोठा संघर्ष आहे. पूर्वी ते छोले-कुलचाचा स्टॉल चालवत होते. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांतून त्यांनी मुलाच्या क्रिकेटच्या स्वप्नाला बळ दिले. सध्या ते बेकरी व्यवसाय करतात. अर्जुनने वयाच्या सातव्या वर्षी जालंधरमधील हरभजन सिंग क्रिकेट इन्स्टिट्यूटमध्ये क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. प्रशिक्षक विक्रम सिद्धू यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने खेळात प्रगती केली. आज पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावत त्याने वडिलांच्या कष्टांचे चीज केले आहे. त्याच्यावर क्रीडा विश्वातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.