IND vs PAK: द्रविड-सेहवागची मुलं सुपरफ्लॉप, छोले-कुलचे विकणाऱ्यांच्या पोरानं पाकिस्तानची चांगलीच जिरवली
IND vs PAK Match: भारत आणि पाकिस्तान सामना सुरु आहे. या सामन्यात एका छोले कुलचे विकणाऱ्याांच्या मुलाने पाकिस्तानची कशी सळो की पळो केली ते जाणून घ्या...

Who Is Arjun Rajput IND vs PAK: अंडर-१९ आशिया कप २०२६ च्या भारत आणि पाकिस्तान या हाय-व्होल्टेज सामन्यात, जेव्हा भारतीय डाव २२/३ आणि नंतर ४२/४ अशा स्थितीत अडखळत होता, तेव्हा जालंधरच्या अर्जुन राजपूतने पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावून संघाला सावरले. त्याने ११ चौकार आणि ४ षटकारांसह ८० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यावरही तो शांत राहिला आणि त्याने टीम इंडियाला एक चांगली धावसंख्या गाठण्यास मदत केली. या खेळीत एकूण ११ चौकार आणि ५ षटकारांसह तो ८५ चेंडूंमध्ये १०७ धावांवर बाद झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताला दुसऱ्याच चेंडूवर धक्का बसला. कर्णधार लक्ष्य रायचंदानी शून्यावर अली रझाच्या गोलंदाजीवर बाद झाला. रझा आणि मोहम्मद सय्यम यांच्या भेदक गोलंदाजीसमोर धावा करणे कठीण झाले आणि भारताला पहिल्या ५ षटकांत केवळ १७ धावाच करता आल्या.
ज्यांच्याकडे सर्वांते लक्ष होते, ज्यांच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा होत्या अशा दोघांनी काहीच केले नाही. वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग आणि राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड दोघेही फ्लॉप ठरले. पण एका जालंधरच्या छोले कुलछे विकणाऱ्यांच्या मुलाने पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले. जिथे एकामागोमाग विकेट पडत होत्या तिथे अर्जुन एकटा उभा राहिला आणि मैदान गाजवले.
कठीण परिस्थितीत अर्जुनने सूत्रे हाती घेतली. ५ चेंडूंत ५ धावांनी सुरुवात करत. २० व्या षटकात त्याने पाकिस्तानचा सर्वात प्रभावी गोलंदाज अली रझाच्या गोलंदाजीवर १० धावा ठोकल्या. त्यावेळी तो ३२ चेंडूंत ३४ धावांवर होता. २२.५ षटकांत (८६/५) अन्वय द्रविड बाद झाला, तेव्हाही अर्जुनसोबत त्याची भागीदारी सुरू होती, पण अर्जुनवर कोणताही दबाव दिसत नव्हता. २४ व्या षटकात त्याने अवघ्या ४३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. ३० षटकांनंतर तो ७२ चेंडूंमध्ये ९० धावांवर होता आणि त्यानंतर त्याने ८० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले.
जालंधरचा रहिवासी असलेला अर्जुन हा डावखुरा फलंदाज आणि ऑफ-स्पिनर आहे. त्याचे वडील, होटी राम, पूर्वी छोले-कुलचाचा स्टॉल चालवायचे आणि आता बेकरी चालवतात. त्या स्टॉलमधून मिळणाऱ्या कमाईतूनच त्यांच्या मुलाच्या क्रिकेटच्या स्वप्नाला चालना मिळाली आणि आता त्याने देशाला गौरव मिळवून दिला आहे. अर्जुनने वयाच्या सातव्या वर्षी जालंधर येथील हरभजन सिंग क्रिकेट इन्स्टिट्यूटमध्ये सुरुवात केली आणि प्रशिक्षक विक्रम सिद्धू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती केली. तो जालंधरच्या डीएव्ही कॉलेजचा विद्यार्थी आहे.
