महेंद्रसिंह धोनी 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का आला? सीएसके प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने खरं काय ते सांगून टाकलं

आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची जोरदार चर्चा रंगली आहे. पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या संघाची या स्पर्धेत हवी तशी कामगिरी होताना दिसत नाही. दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनीच्या बॅटिंग पोजिशनवरूनही निशाणा साधला जात आहे. आता सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

महेंद्रसिंह धोनी 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का आला? सीएसके प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने खरं काय ते सांगून टाकलं
Image Credit source: CSK TWITTER
| Updated on: Mar 31, 2025 | 12:47 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून विजयी सुरुवात केली होती. पण नंतरच्या दोन सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनंतर राजस्थान रॉयल्सकडूनही पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्सने 6 धावांनी चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. धोनी या सामन्यात सातव्या स्थानावर फलंदाजीसाठी आला होता. 16 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्सची पाचवी विकेट पडली. त्यानंतर सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी महेंद्रसिंह धोनी आला. तेव्हा 26 चेंडूत 53 धावांची गरज होती आणि सोबत रवींद्र जडेजा होता. धोनीने या सामन्यात 11 चेंडूंचा सामना केला आणि 1 चौकार आणि 1 षटकार मारत 16 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्स 20 षटकात 6 गडी गमवून 176 धावा करू शकला आणि 6 धावांनी पराभव झाला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात नवव्या स्थानावर उतरला होता. तेव्हा धोनीने 16 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 30 धावा केल्या होत्या. पण चेन्नईचा 50 धावांनी पराभव झाला होता. त्यामुळे त्याच्या बॅटिंग पोझिशनवरून वाद सुरु आहे. असं असताना कोच स्टीफन फ्लेमिंग याने त्याच्या बॅटिंग पोझिशनबाबत बाजू मांडली आहे. शारीरिक स्थितीचे व्यवस्थापन करताना त्याच्या विकेटकीपिंग कर्तव्यांचे संतुलन राखण्यामुळे फलंदाजीत खाली उतरतो, असं फ्लेमिंग याने सांगितलं.

“हो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धोनीला ते पटते. त्याचे शरीर आहे, त्याचे गुडघे पूर्वीसारखे नाहीत. आणि तो व्यवस्थित हालचाल करत आहे, परंतु त्यात अजूनही एक अ‍ॅट्रिशन पैलू आहे. तो व्यवस्थितरित्या धावत 10 षटके फलंदाजी करू शकत नाही. म्हणून तो त्या दिवशी आपल्याला काय देऊ शकतो हे आकलन करतो. जर खेळ आजसारखा संतुलित असेल, तर तो थोडा लवकर फलंदाजीला येईल. पण इतर संधी उपलब्ध झाल्यावर तो इतर खेळाडूंना पाठिंबा देतो. म्हणून तो ते संतुलित करत आहे,” असं स्टीफन फ्लेमिंगने स्पष्ट केले.

“मी गेल्या वर्षीही म्हटले होते की, तो आमच्यासाठी खूप मौल्यवान खेळाडू आहे. नेतृत्व आणि विकेटकीपिंगबाबत सांगायला नको. त्याला नवव्या किंवा दहाव्या षटकात फलंदाजीला पाठवणं काही योग्य ठरणार नाही. त्याने प्रत्यक्षात कधीही असे केले नाही. 13-14 व्या षटकात आसपास कोण आहे? याचा विचार करून मैदानात उतरत आहे.,” फ्लेमिंग म्हणाले.