
नेपाळ क्रिकेट टीमसाठी 27 सप्टेंबर हा दिवस ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा ठरला. नेपाळ टीम आणि त्यांचे चाहते हा दिवस कधीच विसरु शकणार नाहीत. नेपाळने तब्बल 2 वेळा टी 20i वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला लोळवत इतिहास घडवला. उभयसंघात 3 टी 20i मालिकेतील पहिला सामना शनिवारी शारजाहमध्ये खेळवण्यात आला. नेपाळने विंडीज विरुद्ध 148 धावांचा यशस्वी बचाव केला. विंडीजला नेपाळच्या गोलंदाजांसमोर 149 धावांचा पाठलाग करताना 9 विकेट्स गमावून 129 रन्सच करता आल्या.
नेपाळने या विजयासह कोणत्याही संघाला गृहीत धरु नये तसेच लिंबुटिंबु समजू नये, हे दाखवून दिलं. तसेच नेपाळच्या या विजयानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. नेपाळचं या विजयासाठी क्रिकेट विश्वातून अभिनंदन करण्यात आलं. नेपाळने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता नेपाळला आणखी एक सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर विंडीजला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकवा लागणार आहे.
नेपाळ सारख्या तुलनेत नव्या संघासमोर विंडीजसाठी 149 धावा करणं फार अवघड नव्हतं. मात्र नेपाळच्या गोलंदाजांनी कमाल करत विंडीजला रोखण्यात यश मिळवलं. विंडीजच्या फलंदाजांनी नेपाळच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. विंडीजकडून एकाचा अपवाद वगळता कुणालाही 20 पार मजल मारता आली नाही. नवीन बिदाईसी याने सर्वाधिक 22 धावा केल्या. तर इतरांनी नेपाळच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. नेपाळकडून एकूण 7 पैकी 6 जणांनी विकेट मिळवली. कुशल भुर्टेल याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर दीपेंद्र सिंह आयरी, करण केसी, नंदन यादव, ललित राजबंशी आणि कॅप्टन रोहित भुर्टेल या 5 जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
दरम्यान त्याआधी विंडीजने टॉस जिंकून नेपाळला बॅटिंगसाठी भाग पाडलं. नेपाळने 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 148 धावा केल्या. नेपाळसाठी कर्णधार कॅप्टन रोहित पौडेल याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रोहितने 35 बॉलमध्ये 38 रन्स केल्या. रोहितने या खेळीत 1 सिक्स आणि 3 चौकार लगावले. कुशल मल्ला याने 30 धावांचं योगदान दिलं. गुलशन झा याने 22 आणि दीपेंद्र सिंहने 17 धावा जोडल्या. तर चौघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. मात्र त्यानंतही नेपाळने चिवट बॉलिंग केली आणि विंडीज विरुद्ध मालिकेत विजयी सलामी दिली.