वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरी गाठणार का? कर्णधार गिलने एका वाक्यात सांगून टाकलं की…
भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित कठीण झालं आहे. आता भारतासमोर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारखे कठोर कसोटी पेपर आहेत. आता या दोन मालिकेत ते गणित सोडवणं वाटतं तितकं सोपं नाही.

भारत श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. भारताने ही मालिका 1-0 ने जिंकली. पण दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित कठीण झालं आहे. भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला असता तर गणित काही वेगळं असतं. पण आता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजयाचं गणित सोडवावं लागणार आहे. आता भारतासाठी पुढील प्रत्येक सामना ‘करो या मरो’ सारखा असेल. या सामन्यापूर्वी भारताची विजयी टक्केवारी 53.33 टक्के होती. पण सामना ड्रॉ झाल्यामुळे ती कमी होऊन 51.52 टक्के झाली आहे. भारत अजूनही गुणतालिकेत पाचव्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया 80 टक्क्यांसह पहिल्या , दक्षिण आफ्रिका 75 टक्क्यांसह दुसऱ्या, न्यूझीलंड 72.22 टक्क्यांसह तिसऱ्या आणि बांगलादेश 55.56 टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे उर्वरित सात सामन्यात भारताला विजयी टक्केवारी सुधारून पहिल्या दोन स्थानी विराजमान होणं आवश्यक आहे.
दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर गिल काय म्हणाला?
भारताचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही सुमारे 250 षटके क्षेत्ररक्षण केले, आमच्याकडून जे काही शक्य होते ते सर्व आम्ही केले. मला नाही वाटत की आम्ही यापेक्षा काही वेगळे करू शकलो असतो. आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी आहेत, जसे की प्रतिस्पर्धी संघाकडून शिकणे. ज्या प्रकारे त्यांनी पुनरागमन केले, ते पाहणे जबरदस्त होते. मला नाही वाटत की आम्ही काही वेगळे करू शकलो असतो. देवदत्त उत्कृष्ट होता, केएल चांगला होता. आमचे गोलंदाज चांगले होते, त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. खूप उत्साहित आहोत, आमच्यासाठी हा खरोखरच एक रोमांचक काळ आहे. आमच्या तयारीमध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे.’
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीबाबत शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही नेहमी विश्वास ठेवत राहू आणि आशा आहे की आम्ही अंतिम फेरीत पोहोचू. या सामन्यात त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. हवामानाचा विचार करता, आम्ही या गोष्टींबद्दल फक्त नंतरच बोलू शकतो.’ भारताला अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित सात पैकी 5 सामन्यात विजय अनिवार्य आहे. भारताने फार एक सामना गमावला तर चालू शकतो. दोन किंवा त्याहून अधिक सामन्यात पराभव झाला तर अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले. आता भारताने नोव्हेंबर 2026 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळायचे आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे.