
श्रीलंका वूमन्स टीमचे फलंदाज सलग दुसऱ्या टी 20i सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ढेर झाले आहेत. श्रीलंका टीमला दुसऱ्या सामन्यातही 130 पार मजल मारता आली नाही. भारताने श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 9 झटके देऊन 128 रन्सवर रोखलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला सलग दुसऱ्या विजयासाठी अवघ्या 129 धावांची गरज आहे. श्रीलंकेने 2 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना फार यश आलं नाही. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला झटपट झटके दिले. त्यामुळे श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर ज्यांना सुरुवात मिळाली त्यांनाही श्रीलंकेला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवता आलं नाही. त्यामुळे आता टीम इंडिया हे आव्हान किती षटकांत पूर्ण करते? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
भारताने श्रीलंकेला 2 धावांवर पहिला झटका दिला. क्रांती गौड हीने आपल्याच बॉलिंगवर विश्मीला कॅच आऊट करत श्रीलंकेला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका दिला. ओपनर विश्मी गुणरत्ने 1 धाव करुन आऊट झाली. त्यानंतर कॅप्टन चमारी अट्टापट्टू आणि हसीनी परेरा या दोघींनी काही वेळ भागीदारी केली. मात्र स्नेह राणा हीने ही भागीदारी मोठी होण्याआधीच ब्रेक केली. स्नेहने चमारीला आऊट करत श्रीलंकेला मोठा झटका दिला. चमारीने 31 धावांची खेळी केली.
चमारीनंतर हर्षिता समरविक्रमा आणि हसीनी परेरा या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 100 च्या स्ट्राईक रेटने 44 बॉलमध्ये 44 रन्सची पार्टनरशीप केली. हसीनीने 22 धावा केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर हर्षिता आणि कविषा दिलहारी या जोडीने 21 बॉलमध्ये 22 रन्सची पार्टनरशीप केली.
टीम इंडियाने श्रीलंकेला चौथा झटका दिल्याने त्यांची स्थिती 16.2 ओव्हरमध्ये 4 आऊट 104 अशी झाली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कहर केला. भारताने श्रीलंकेला अवघ्या 25 धावांच्या मोबदल्यात 5 झटके दिले. त्यामुळे श्रीलंकेचा स्कोअर 20 ओव्हरमध्ये 9 आऊट 128 असा झाला. टीम इंडियासाठी श्री चरणी आणि वैष्णवी शर्मा या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर क्रांती गौड आणि स्नेह राणा या जोडीने 1-1 विकेट मिळवली. तर टीम इंडियाने 3 विकेट्स या कडक फिल्डिंग करत रनआऊट द्वारे मिळवल्या. आता टीम इंडिया हा क्रिकेट सामना किती ओव्हरमध्ये संपवते? याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.