Women’s T20 World Cup : टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित आता पाकिस्तानच्या हातात, असं झालं नाही तर…

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीची लढत आता रंगतदार वळणावर आली आहे. भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाची धूळ चाखावी लागल्यानं गणित बिघडलं होतं. त्यानंतर टीम इंडियाने कमबॅक करत पाकिस्तान आणि श्रीलंकेला धोबीपछाड दिला. असं असलं तरी भारताचं उपांत्य फेरीचं गणित पाकिस्तानच्या हाती आहे.

Womens T20 World Cup : टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित आता पाकिस्तानच्या हातात, असं झालं नाही तर...
| Updated on: Oct 12, 2024 | 6:47 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेची उपांत्य फेरीचं गणित आता रंजक वळणावर येऊन ठेपलं आहे. अ गटातून ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत आपला दावा जवळपास पक्का केला आहे. मात्र भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसऱ्या संघासाठी जोरदार चुरस आहे. भारत आणि न्यूझीलंड यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे भारत दुसऱ्या, तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर 4 गुणांसह आहेत. फक्त नेट रनरेटचा काय तो फरक आहे. भारताचा नेट रनरेट हा +0.576 आहे, तर न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +0.282 इतका आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी, तर न्यूझीलंडचा शेवटचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं गणित सर्वस्वी पाकिस्तानवर अवलंबून आहे. कारण भारत आणि न्यूझीलंडच्या नेट रनरेटमध्ये फार काही फरक नाही. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडसाठी पुढचे सामने खूपच महत्त्वाचे आहे. दोन्ही संघांना पुढच्या सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे.

भारतीय संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा विजय मिळवला तर 6 गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेईल आणि उपांत्य फेरीचं स्थान पक्कं होईल. पण जर कमी फरकाने पराभव केला तर मात्र सर्व गणित पाकिस्तानच्या सामन्यावर अवलंबून असेल. कारण शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ विजयासह नेट रनरेटचं गणित राखण्यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळे भारतीय संघाची पाकिस्तानकडून अपेक्षा असणार आहे.

वुमन्स टी20 वर्ल्डकप अ गट

संघ जुळतात जिंकणे पराभव N/R गुण नेट रनरेट
ऑस्ट्रेलिया 3 3 0 0 6 +2.786
भारत 3 2 1 0 4 +0.576
न्यूझीलंड 3 2 1 0 4 +0.282
पाकिस्तान 3 1 2 0 2 -0.488
श्रीलंका 4 0 4 0 0 -2.173

भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला तर मात्र पाकिस्तानकडून न्यूझीलंडच्या पराभवाची अपेक्षा करावी लागेल. कारण सरतेशेवटी तीन संघांचे प्रत्येकी 4 गुण होतील आणि नेट रनरेटच्या आधारावर दुसरा संघ ठरवला आहे. भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ शर्यतीत असतील. या तीन संघांचे प्रत्येकी 4 गुण होतील. तसं पाहिलं तर पाकिस्तानचा नेट रनरेट वजाबाकीत आहे. त्यामुळे जिंकूनही रिकव्हर होणार नाही. पण भारताला मात्र फायदा होईल. त्यामुळे अशी स्थिती ओढावली तरी नेट रनरेटवर सर्वकाही ठरणार आहे.