GGW vs UPWW : गुजरात जायंट्सचा पहिला विजय, यूपी वॉरियर्सचा 6 विकेट्सने धुव्वा
Gujarat Giants Women vs UP Warriorz Women Match Result : गुजरात जायंट्सला पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र गुजरातने दणक्यात कमबॅक करत यूपीवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.

वूमन्स प्रीमिअर लीग 2025 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने विजयाचं खातं उघडलं आहे. गुजरात जायंट्ने यूपी वॉरियर्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. यूपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सला विजयासाठी 144 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरात जायंट्सने हे आव्हान 12 बॉलआधी 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. गुजरातने 18 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 144 धावा केल्या. हा सामना वडोदऱ्यातील कोतंबी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. गुजरातचा हा दुसऱ्या सामन्यातील पहिला विजय ठरला. गुजरातला 14 फेब्रुवारीला बंगळुरुकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं.
गुजरातची बॅटिंग
बेथ मूनी आणि दयालन हेमलथा या दोघींना भोपळाही फोडता आला नाही. या दोघींचा अपवाद वगळता गुजरातकडून चौघींनी जबरदस्त बॅटिंग करत विजयाचा मार्ग सोपा केला. गुजरातसाठी कॅप्टन एश्ले गार्डनर हीने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. लॉरा वोल्वार्ड हीने 22 धावांचं योगदान दिलं. तर त्यानंतर हर्लीन देओल आणि डीएन्ड्रा डॉटीन या दोघींनी पाचव्या विकेटसाठी 58 धावांची नाबाद भागीदारी केली. हर्लीनने 30 बॉलमध्ये नॉट आऊट 34 रन्स केल्या. तर डीएन्ड्रा डॉटीनने 18 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी केली. यूपीकडून सोफी एक्लेस्टोन हीने 2 विकेट्स घेतल्या. तर ग्रेस हॅरीस आणि ताहिला मॅकग्राथ या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पहिल्या डावात काय झालं?
दरम्यान त्याआधी गुजरातने टॉस जिंकून यूपीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. यूपीने 9 विकेट्स गमावून 143 धावा केल्या. यूपीकडून बहुतांश फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र एकीलाही मोठी खेळी करता आली नाही. गुजरातकडून प्रिया मिश्रा हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कॅप्टन एश्ले गार्डनर आणि डीएन्ड्रा डॉटीन या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर काश्वी गौतम हीने 1 विकेट मिळवली.
गुजरात जायंट्स प्लेइंग इलेव्हन : ॲश्ले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (विकेटकीपर), लॉरा वोल्वार्ड, दयालन हेमलता, डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, हरलीन देओल, तनुजा कंवर, सायली सातघरे, काशवी गौतम आणि प्रिया मिश्रा.
यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन : दीप्ती शर्मा (कर्णधार), उमा चेट्री (विकेटकीपर), वृंदा दिनेश, ग्रेस हॅरिस, ताहलिया मॅकग्रा, किरण नवगिरे, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, अलाना किंग, सायमा ठाकोर आणि क्रांती गौड.