WPL Final 2026 : आरसीबीसमोर महाअंतिम सामन्यात 204 धावांचं विक्रमी आव्हान, दिल्ली पहिली ट्रॉफी जिंकणार?

Royal Challengers Bengaluru Women vs Delhi Capitals Women Final : दिल्ली कॅपिट्ल्सच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी अंतिम सामन्यात धमाका करत 200 पार मजल मारली आहे. दिल्लीने आरसीबीसमोर 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

WPL Final 2026 : आरसीबीसमोर महाअंतिम सामन्यात 204 धावांचं विक्रमी आव्हान, दिल्ली पहिली ट्रॉफी जिंकणार?
Jemimah Rodrigues WPL Final 2026
Image Credit source: WPL/BCCI
| Updated on: Feb 05, 2026 | 10:08 PM

दिल्ली कॅपिट्ल्सने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील अंतिम (WPL 2026 Final) सामन्यात धमाका केला आहे. दिल्लीने जेमिमाह रॉड्रिग्स हीच्या नेतृत्वात डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 203 धावा केल्या आहेत. त्यामुळे आरसीबीला आता ट्रॉफी जिंकण्यासाठी 20 ओव्हरमध्ये 204 धावा कराव्या लागणार आहेत. आरसीबीच्याच नावावर या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च आणि विक्रमी 202 धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम आहे.  त्यामुळे आरसीबी या महाअंतिम सामन्यात ऐतिहासिक रन चेज करत दुसऱ्यांदा चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवणार की दिल्ली चौथ्या प्रयत्नात यशस्वी होणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

आरसीबीची कॅप्टन स्मृती मंधाना हीने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीच्या फलंदाजांनी या संधीचा पूर्ण फायदा घेत स्पर्धेतील अंतिम सामन्यांच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. दिल्लीच्या पहिल्या पाचही फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे दिल्लीला 200 पार मजल मारता आली.

दिल्लीची बॅटिंग

शफाली वर्मा आणि लिझेल ली या सलामी जोडीने दिल्लीला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र शफाली या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी झाली. शफाली दिल्लीच्या 49 धावा असताना आऊट झाली. शफालीने 20 धावा केल्या. त्यानंतर लिझेल आणि आणि जेमिमाह रॉड्रिग्स या दोघींनी 23 धावा जोडल्या. दिल्लीने लिझेलच्या रुपात 72 धावांवर दुसरी विकेट गमावली. लिझेलने 30 बॉलमध्ये 37 रन्स केल्या.

गिअर शिफ्ट, फटकेबाजी मोड ऑन

त्यानंतर जेमिमाह, लॉरा वॉल्वॉर्ड्ट आणि चिनेल हेन्री या त्रिकुटाने धमाका केला. जेमी आणि लॉरा या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. जेमीने या दरम्यान चौथ्या मोसमातील दुसरं अर्धशतक केलं. त्यानंतर जेमी 57 धावांवर आऊट झाली. जेमी आऊट होताच तिसऱ्या विकेटसाठीची भागीदारी मोडीत निघाली. जेमी आणि लॉराने 51 बॉलमध्ये 76 रन्सची पार्टनरशीप केली.

दिल्ली 203 धावांचा बचाव करणार?

चिनेलची चाबूक बॅटिंग

जेमीनंतर लॉरा आणि चिनेलने आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. या जोडीने शेवटच्या 24 चेंडूत 54 धावा कुटल्या. लॉरा शेवटच्या बॉलवर आऊट झाली. लॉराने 25 बॉलमध्ये 44 रन्स केल्या. तर चिनेलने फक्त 15 बॉलमध्ये नॉट आऊट 35 रन्स केल्या. आरसीबीकडून सायली सातघरे, अरुंधती रेड्डी आणि नाडीन डी क्लार्क या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.