
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या दुसर्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल हा युपी वॉरियर्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 207 धावा केल्या आणि विजयासाठी 208 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना युपी वॉरियर्सने 197 धावांपर्यंत मजल मारली. विजयासाठी 10 धावा तोकड्या पडल्या आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. गुजरात जायंट्सकडून एशले गार्डनरने 41 चेंडूत 65 धावांची खेळी केली. तसेच अनुष्का शर्माने 30 चेंडूत 44 धावा ठोकल्या. त्यामुळे 207 धावांपर्यंत मजल मारता आली.
विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना युपी वॉरियर्स सुरुवात काही चांगली झाली नाही. किरण नवगिरे फक्त 1 धाव करून बाद झाली. त्यानंतर मेग लेनिंग आणि फोबी लिचफिल्डने डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची खेळी केली. पण ही जोडी फुटली आणि दोन विकेट धडाधड पडल्या. मेग लेनिंग 30 धावांवर बाद झाली. त्यानंतर फलंदाजीला आलेली हरलीन देओल 0 आणि दीप्ती शर्मा 1 धाव करून बाद झाले. त्यामुळे संघावर दडपण वाढलं आणि पराभवाच्या दिशेने कूच सुरू झाली. शेवटच्या षटकात विजयासाठी 27 धावांची गरज होती. पण 15 धावा करता आल्या आणि 10 धावांनी पराभव झाला.
युपी वॉरियर्सची कर्णधार मेग लेनिंगने सांगितलं की, ‘मला वाटले की हा एक चांगला खेळ होता आणि आमच्यासाठी अनेक सकारात्मक बाबी होत्या. अर्थात, आम्हाला विजयाने सुरुवात करायला आवडली असती, पण आम्ही ते जास्त काळ एकत्र ठेवू शकलो नाही. तरीही, पहिला सामना गमावणे छान होते आणि पुढच्या सामन्यात आम्ही बरेच काही करू शकतो. मला वाटले की जायंट्सने खूप चांगली फलंदाजी केली आणि आमच्यावर दबाव आणला. आम्ही कदाचित आम्हाला आवडेल तितकी चांगली कामगिरी केली नाही, परंतु आम्ही दबाव निर्माण करण्याचा आणि त्यांना शक्य तितके मर्यादित करण्याचा प्रयत्न करत राहिलो. आता ते शिकण्याबद्दल आणि पुढील आव्हानाचा आनंद घेण्याबद्दल आहे.’